NCP Sharad Pawar
NCP Sharad Pawar sakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar : संघटना बळकट करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासमोर आव्हान

सदानंद पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी ४० आमदारांसह लावलेला सुरुंग, अधिकृत पक्ष आणि चिन्हाचा घेतलेला ताबा, राज्याच्या कानाकोपऱ्यात खिळखिळी केलेली संघटना आणि वैयक्तिक हल्ले करून शरद पवार आणि उर्वरित राष्ट्रवादीला घेरण्याचे प्रयत्न... या आव्हानाला शरद पवार ताकदीने सामोरे जात आहेत. मात्र राष्ट्रवादीचे इतर नेते पवारांना मिळत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊ पाहत आहेत. अशा एकूण परिस्थितीत संघटना बळकट करण्याचे प्रमुख आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासमोर आहे.

विकासाचा मुद्दा पुढे करत अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याचे सांगितले जात असले, तरी केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवणे हेच मुख्य कारण असल्याची टीकाही झाली. अनेक नेत्यांची चौकशी सुरू असल्याने, त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पक्ष फुटीबद्दल शोक करत बसण्यापेक्षा नव्या उमेदीने कामाला लागण्याचा निर्धार शरद पवार यांनी केला आहे.

यातूनच त्यांनी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र पिंजून काढत पक्ष, संघटना आणि निवडणुकीची चाचपणी केली. राष्ट्रवादीकडे येणाऱ्या जागांसाठी तुल्यबळ उमेदवार शोधण्याची मोहीमही ते राबवत आहेत. आमदार नीलेश लंके यांची घरवापसी ही सध्या तरी पवार गटासाठी जमेची बाजू आहे. राष्ट्रवादी पक्षाला मिळणाऱ्या जागेवर चांगले बलाढ्य उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षाची ताकद वाढवायची असेल तर संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. याकडे मात्र सध्या दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. असे नियोजन करण्यात राष्ट्रवादी मात्र कमी पडत असल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्ष संघटना मोडकळीला आल्याचे चित्र दिसते. या सर्वांतून उभारी घेणे आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य, उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्यपूर्ण असताना, तेच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा घडवून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. वारंवार होणाऱ्या अशा चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण होताना दिसतो. राष्ट्रवादी पक्षासह शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्याकडून कडवे प्रत्युत्तर दिले जात आहे.

तर खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे पुणे जिल्ह्यातील आपल्या लोकसभा मतदारसंघांत प्रचारात गुंतून पडले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख विदर्भात पक्षाचा झेंडा फडकावत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याचा पक्ष छोट्या छोट्या टप्प्यांत विखुरलेला असून, एकत्रित प्रभाव दिसण्यासाठी पक्षाला पावले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी शरद पवार यांना जिल्हा पातळीपर्यंतच्या नेत्यांची साथ मिळणे गरजेचे आहे.

बारा जागांची मागणी

राष्ट्रवादीचे विभाजन झाल्याचा परिणाम तिकीट वाटपावरही दिसत आहे. पवार गटाने लोकसभेसाठी १२ जागांची मागणी केली आहे. पुणे जिल्हा वगळता इतर ठिकाणी सक्षम, तोडीस तोड उमेदवार देणे हे या पक्षासमोर मोठे आव्हान आहे. आघाडीकडे १२ जागा मागितल्या असल्यातरी नेमक्या किती जागा मिळणार, हे देखील पहावे लागणार आहे. बारामती या होम ग्राउंडवर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील निवडणुकीआधीच टिपेला पोहोचला आहे.

मात्र बारामतीबरोबरच महाविकास आघाडीची नौका पैलतीरावर नेण्यासाठीही शरद पवार यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही शरद पवार यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात ते आजही केंद्रस्थानी आहेत. पवार यांच्यावर जितकी वैयक्तिक टीका होईल, तितकी सहानुभूती त्यांच्यासह महाविकास आघाडीच्या वाट्याला आल्यास नवल वाटणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT