Sangli loksabha
Sangli loksabha  sakal
लोकसभा २०२४

Sangli Loksabha : तीन पाटलांचा प्रचाराचा धडाका, सांगलीत कोण बाजी मारणार ?

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघातील तीन प्रमुख उमेदवारांनी आज सांगली शहर आणि विधानसभा मतदार संघात आज एकाच दिवशी प्रचाराचा धडाका लावला. पहाटेपासून ते मतदारांशी संवाद साधायला बाहेर पडले. शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांनी पहाटे व्यायाम करणाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत व्यायाम केला. संजय पाटील यांनी शहरासह ग्रामीण भागात बैठका घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. या निवडणुकीत सांगलीत विधानसभा मतदार संघाचा मूड निर्णायक ठरण्याची चिन्हे असल्याने तीन प्रमुख उमेदवारांचे या शहरावर विशेष लक्ष आहे.

व्यायाम करत चंद्रहार यांच्या भेटीगाठी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज मॉर्निंग वॉकर्ससह व्यायाम करणाऱ्या तरुणाईची भेट घेतली. स्वतः मैदानात उतरत या पैलवानाने व्यायामही केला. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठांशीही त्यांनी संवाद साधला.

चंद्रहार पाटील यांनी आज सकाळी शहरातील आमराई उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आणि महावीर उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, हास्य क्लबचे सदस्य आणि व्यावसायिक यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. खेळाडूंसमवेत व्यायामही त्यांनी केला. चंद्रहार म्हणाले, ‘‘तरुणांची सक्षम पिढी घडवण्यासाठीच उमेदवारी दाखल केली आहे. मी स्वतः खेळाडू असल्याने अडचणी माहिती आहेत. त्या प्राधान्याने सोडवल्या जातील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात चांगल्या, अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेले क्रीडा संकुल उभारणार आहे. खेळाडूंना या ठिकाणी दर्जेदार सुविधा मिळतील, जेणेकरून सांगलीचे नाव जगात गाजेल. यासह छोट्या व्यावसायिकांसाठी प्राधान्याने नावीन्यपूर्ण योजना राबवण्यावर भर असेल.’’

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील तरुणांना व्यसनमुक्त करून भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासंदर्भात प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र उभारण्यासाठी प्राधान्य देऊ.’’ या वेळी बजरंग पाटील, शंभोराज काटकर, ऋषिकेश पाटील यांची मनोगते झाली. विराज बुटाले, शीतल थोरवे, मयूर घोडके, अण्णा विचारे, किशोर सासणे, राम काळे, प्रताप पवार, मनीषा पाटील, सरोजिनी माळी, स्नेहल माळी, शाकिरा जमादार यांच्यासह युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर मिरज तालुक्यातील हरिपूर, अंकली, जुनी धामणी येथील मतदारांची भेट घेतली. नागरिकांना महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन चंद्रहार यांनी केले.

वसंतदादांच्या गावी संजय पाटील

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पद्माळे गावात जाऊन भाजप उमेदवार, खासदार संजय पाटील यांनी आज प्रचार केला. तेथील समर्थकांनी फटाक्यांची मोठी माळ लावत स्वागत केले. नांद्रे, कर्नाळ, हरिपूर, अंकली, जुनी धामणी, इनाम धामणी, बामणोली, माधवनगर, बुधगाव, बिसूर, खोतवाडी येथे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांचा प्रचार दौरा केला. गावांत भेटीगाठी व बैठका घेण्यात आल्या.

गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला. मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. उर्वरित कामेही येत्या काळात पूर्ण केली जातील, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली. हरिपूरला फुलांची उधळण करत खासदार संजय पाटील यांचे स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. पदयात्रा काढली. संगमेश्वर मंदिर परिसरात सभा झाली. खासदार पाटील म्हणाले, ‘‘देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४०० खासदार देण्याची जिद्द जनतेने ठेवली आहे, असा विश्वास असून मलाही संधी द्या.’’ बामणोली येथे म्हणाले, ‘‘कोरोना, महापुरात जनतेला मोठ्या प्रमाणात मदत केली. कोट्यवधींचा निधी आणला. येत्या काळात उर्वरित कामे करू.’’

आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, जिल्हा सरचिटणीस अरविंद तांबवेकर यांच्यासह पदाधिकारी दौऱ्यात सहभागी झाले. हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर, उपसरपंच युवराज बोंद्रे, बामणोलीच्या सरपंच गीताताई सिंदकर, सुभाष सिंदकर, उपसरपंच विष्णू लोटे यांच्यासह सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

विशाल पाटील यांचा ‘हास्ययोग’

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. हास्ययोग करत तणावातून थोडा मोकळा श्‍वासदेखील घेतला. आमराई व महावीर उद्यानात त्यांनी सांगलीकरांशी संवाद साधला. वृत्तपत्र विक्रेते, खेळाडू, हमाल, फळविक्रेत्यांसह विविध संघटनांपुढे त्यांनी आपली भूमिका मांडली.

पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांची भेट झाली. विकास सूर्यवंशी, मारुती नवलाई, अमोल साबळे यांच्यासह विक्रेत्यांनी त्यांचे स्वागत केले. विकास सूर्यवंशी म्हणाले, ‘‘वसंतदादा घराण्याने नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांना साथ दिली आहे. राज्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेता भवन उभारण्यास दादा घराण्याने मदत केली. कोरोना काळात मदत मिळाली.’’

कृष्णामाई घाटावर पोहणाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. घाटावरील सुविधांबाबत चर्चा केली. तेथे संजय चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडूंची भेट घेतली. क्रीडांगणावरील सोयी-सुविधांची माहिती घेत खेळाला प्राधान्य देण्यासाठी आपण काम करण्याची ग्वाही दिली. आमराई व महावीर उद्यान (बापट मळा) येथे नागरिक, महिलांशी संवाद साधला. शहरातील विकासकामांवर चर्चा केली. महावीर उद्यानातील हास्य क्लबला भेट दिली. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याकडून हास्याचा व्यायाम करवून घेतला. विश्रामबाग येथे नाश्ता सेंटरवर चहासमवेत नागरिकांशी चर्चा झाली. बिरनाळे कॉलेज नाश्‍ता सेंटरवरील नागरिकांची भेट घेतली. मार्केट यार्डातील हमाल, खोकीधारक व विष्णुअण्णा फळ मार्केटमधील विक्रेत्यांशी संवाद साधला. शहराचा आवाज दिल्लीत प्रभावीपणे पोहोचला पाहिजे. ‘गत दहा वर्षांत सांगलीत दिल्लीतून आलेले एक काम सांगा. हे शहर पुढे गेले पाहिजे,’ अशी भूमिका मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT