महाराष्ट्र

का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? कोठे कसा साजरा होतो पाडवा?

सकाळ वृत्तसेवा

आज दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा दिवस. सर्वत्र दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा साजरी केली जाते. हा सण नेमका काय आहे? कोठे कसा साजरा केला जातो? काय आहे परंपरा? जाणून घेऊयात. 

बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा

नागरी जीवनात पाडव्याला पत्नीने पतीला उटणे लावून, तेलाने मसाज करून स्नान घालण्याला आणि औक्षण करण्याला महत्त्व आहे. 

औक्षण केल्यानंतर पती पत्नीला प्रेमभेट देतो. असे असले तरी, हा सण मुळात अनागर संस्कृतीतून, कृषीसंस्कृतीतून फुललेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. गावातील लहान मुले एका हातात फुलबाजी धरुन ती गोलगोल फिरवत एक गाणे म्हणतात 

'दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी...'

पूर्वी गावाकडे घराघरातले गुराखी आपली गुरे रानात चारायला जायचे. तिथे त्या गुरांना बिबट्यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात काठी बाळगायचे. आपले गोधन वाचवण्यासाठी ते त्या बिबट्यांना काठीने हाणून पळवायचे. त्याचीच आठवण देणारे हे लोकगीत. हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. मुळात दिवाळी हा सणच शेतकऱ्यांचा आहे, याची आठवण या दिवसामुळेच येते.

शेतकरी आज घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुरांना ओवाळतो. त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते.

- कोकणात आज गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांना हिरसुणीचे (माडाच्या झावळांचे हीर काढून केलेली झाडू) हीर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूधहंडे केले जातात. येणाऱ्या जाणाऱ्यांना ताक दिले जाते.

- मराठवाड्यात गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या (एक प्रकारचे गवत) दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर चंद्र-सूर्य रेखले जातात. येथेही शेणाच्या गवळणी तयार केल्या जातात. डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.

- ठाणे-रायगड भागातील आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर तांदळाच्या पिठीपासून `कणे` (रांगोळी) काढले जातात. या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे फूल वाहिले जाते. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची आपल्या घरादारावर कायम कृपा राहावी, अशी यावेळी प्रार्थना केली जाते.

- धनगर समाजात हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण. मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावलें जातें. मेंढ्यांच्या लेंड्यांपासून वाडा तयार करतात. वाडा म्हणजे अगदी अख्खे गाव वसवून त्यात घरे, घरातली माणसे, असा देखावा तयार करतात.

- आदिवासी समाज आपल्या गुरांच्या-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप करून त्याच्यात दिवे पाजळतात. बलिप्रतिपदेचा दिवशी आदिवासी आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेर त्यांनी आधीच एक आखाडा तयार केलेला असतो. त्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गाय

- बकऱ्यांना बळीराजाच्या नावाने पळवत नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला आदिवासी 'ढोर उठवणे' असे म्हणतात.

- पाठारे प्रभू समाजातील घराघरांत घोड्यावर बसलेल्या बळीराजाची मूर्ती असते. या दिवशी पहाटेच प्रभू गृहिणी घरातला केर-कचरा काढते आणि घराबाहेर टाकायला जाताना थाळा वाजवत म्हणते- इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. हे बळीचें राज्य म्हणजे अर्थातच शेतकरी राजाचें राज्य.

गोवर्धन पूजा

दिवाळीचा हा चौथा दिवस `वर्ष प्रतिपदा` म्हणूनही जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

मथुरेकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. याला अन्नकूटोत्सवही म्हटले जाते.

प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्र्पूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत केले गेले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्ण मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला 'अन्नकूट' म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT