banyan tree
banyan tree sakal
महाराष्ट्र

वटपौर्णिमा विशेष : महाकाय पवित्र वटवृक्ष

डॉ. मधुकर बाचूळकर-चोळेकर

वड हा देशी वृक्ष असून, भारतीय संस्कृतीत तो पवित्र मानला जातो. वटपौर्णिमेनिमित्ताने वडाचे पूजन केले जाते. वडाचे सांस्कृतिक महत्त्व आहेच; शिवाय त्याचे औषधी गुणही मोलाचे आहेत.

वटवृक्ष मुळचा भारतीय उपखंडातील असून, वडाचे वृक्ष भारत, पाकिस्तान, म्यानमार, थायलंड, दक्षिण चीन, मलेशिया या देशातील मोसमी, पावसाळी जंगलात नैसर्गिकपणे वाढलेले आढळतात. तसेच बहुतेक ठिकाणी या वृक्षाची रस्त्याच्या कडेने लागवड केलेली दिसून येते. मंदिर परिसरात व देवरायांमध्येही वटवृक्ष दिसतात.

वटवृक्षास १९५०मध्ये भारताचा ‘राष्ट्रवृक्ष’ हा बहुमान प्राप्त झाला. गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचा ‘राज्यवृक्ष’ हा सन्मानही वटवृक्षास मिळाला आहे. हिंदू संस्कृतीत वटवृक्ष हा ताकद, सामर्थ्य, शक्ती, एैक्य, आत्मजागरूकता, ध्यान आणि मन:शांती यांचे प्रतीक असल्याचे मानतात. वटपौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी सुवासिनी महिलांकडून पारंपरिकपणे वडाची पूजा केली जाते. हा सण आजही सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.

औषधी गुणधर्म

वडाची साल, मूळ, पाने, बिया आणि दुधाळ चीक हे भाग औषधी गुणधर्माचे असून, त्यांचा आयुर्वेद औषधांत वापर करतात. या झाडापासून निघणारा दुधाळ चीक दुखणे, खरचटणे, संधिवात, कटिशूळ यात बाह्य उपाय म्हणून उपयोगी आहे. हातापायांना भेगा व कात्रे पडतात, ते चीक लावल्याने भरून येतात. किडलेल्या दाढा व दातात चीक भरल्याने वेदना कमी होतात. वडाचा चीक वेदनास्थापन व व्रणरोपण गुणधर्माचा आहे.

कंबरदुखीत व सांधेदुखीत चिकाचा लेप करतात. चीक दाह कमी करतो. मूळव्याध, नाकाचे रोग, परमा यामध्ये चीक उपयुक्त आहे. सालीचा फांट उत्तम पौष्टिक असून मधुमेहात साखर कमी करण्यास उपयोगी आहे. प्रमेहात मुळाची आंतरसाल त्रिफळाबरोबर मधातून देतात. वडाची पाने मिऱ्याबरोबर तांदळाच्या पेजेत उकडून ती पेज, ज्वर घाम येऊन कमी होण्यास देतात. गरम केलेली पाने पोटीस म्हणून वापरतात. कोवळ्या गडूंचा फांट अतिसार आणि आमांशात उपयोगी आहे.

वडाच्या बिया शीत आणि पौष्टिक गुणधर्माच्या आहेत. पारंब्या रक्तस्तंभक असून, उपदंश, पित्तप्रकोप, आमांश व यकृताच्या दाहात गुणकारी आहेत. उलट्या थांबविण्यासाठी तसेच परम्यात पारंब्याचा काढा देतात. पारंब्याची टोके व ज्येष्ठमध वाटून लोण्याबरोबर वांग कमी होण्यासाठी लावतात. केशवर्धक तेल करण्यासाठी ही पारंब्याचा वापर करतात. वृक्षाचा पर्णसंभार जितका जास्त असतो, तितका तो वृक्ष जास्त प्राणवायूची निर्मिती करतो. मोठ्या आकाराचा वटवृक्ष वर्षभरात सुमारे सहा हजार पौंड प्राणवायू हवेत सोडतो, असे मानतात.

वटवृक्ष उपयुक्त, बहुगुणी असल्याने त्याचे संरक्षण-संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. पूर्वी महामार्ग आणि रस्त्यांच्याकडेने वडाची झाडे मोठ्या संख्येने होती. काही दशकांपासून रस्ते विकास प्रकल्पांत मोठे वटवृक्ष नष्ट झाले आहेत आणि त्याठिकाणी आता विदेशी वृक्षांची लागवड होत आहे. रस्त्याच्याकडेने व इतरत्रही वटवृक्षांची लागण केली जात नाही. देवरायांचाही झपाट्याने विनाश होत आहे. पूर्वी शहर परिसरातही वटवृक्षांची संख्या लक्षणीय होती.

वटवृक्षांचे सर्वेक्षण होऊन त्यांना विशेष ‘हेरिटेज ट्री’ हा दर्जा देऊन त्यांचे संवर्धन गरजेचे आहे. वृक्ष व पर्यावरण प्रेमींनी जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी, मोकळ्या जागी वडाच्या रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड करून त्यांचे योग्य संगोपन करावे.

वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडाच्या रोपांची लागवड करून त्याची पूजा करण्याची प्रथा सुरू करावी. यामुळे वटवृक्षांची संख्या वाढण्यास हातभार लागेल. वडाची झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने यापुढे वटवृक्षांची तोड न करता, या वृक्षांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करावे.

  • वडाचे शास्त्रीय नाव - फायकस बेन्गालेन्सिस

  • हा वृक्ष ‘मोरेएसी’ म्हणजेच उंबर, अंजीर, पिंपळ यांच्या कुळातील.

  • इंग्रजीतील नाव - ‘बनियान ट्री’ किंवा ‘बॅनियन ट्री’.

  • बॅनियन हे सामान्य नाव बनियास या शब्दावरून आले असून, पोर्तुगीजांनी हा शब्द विशेषतः व्यापारासाठी वापरला आहे. हे व्यापारी वडाच्या झाडाखाली व्यापार करीत असत. यावरून वटवृक्षास इंग्रजीत ‘बॅनियन ट्री’ असे नाव ठेवले.

  • संस्कृतमधील नाव - वट, अवरोहा, न्यग्रोध, जटाल, बहूपाह

पानांची वैशिष्ट्ये

  • पाने साधी, एका आड एक, १० ते २० सें.मी. लांब व ५ ते १२.५ सें.मी. रूंद असून, चिवट, अंडाकृती ते लंब वर्तुळाकार असतात.

  • पानाचा तळ हृदयाकृती किंवा गोलाकृती असून, वरची बाजू गडद हिरवी व चमकदार असते.

  • पानाच्या बेचक्यातून ०.५ ते २.० सें.मी. व्यासाचे, हिरव्या रंगाचे, लहान गोलाकार फळांसारखे गडू तयार होतात. हे गडू म्हणजेच वडाच्या पुष्पमंजिऱ्या. गडूच्या मध्यभागी गोलाकार पोकळी असून, देठाच्या विरुद्ध बाजूस लहान छिद्र असते. गडूच्या छिद्राभोवती सुक्ष्म, नर फुले, तळाकडील बाजूस मादी फुले आणि नर व मादी फुलांच्या मधल्या भागात वांझ फुले असतात. परागीभवन व फलधारणेनंतर मादी फुलांचे रूपांतर बिया व फळांमध्ये होते. त्यानंतर हिरव्या गडूचे आकारमान वाढू लागते व रंग बदलू लागतो आणि गडूचे रूपांतर संयुक्त फळामध्ये होते. गडू पिकल्यानंतर तांबूस रंगाचे बनतात. यामध्ये अनेक सुक्ष्मफळे असतात.

  • वडाचा सदाहरित वृक्ष ५० मीटर किंवा त्यापेक्षाही उंच वाढतो.

  • वटवृक्षाचे आयुष्यमान सर्वसाधारणपणे ३०० ते ५०० वर्षे इतके मानले जाते.

  • फांद्या अनेक, सर्व बाजूने पसरणाऱ्या असल्याने वृक्षाचा विस्तार मोठा होतो.

  • मोठ्या आकाराच्या फांद्यांना आधार मिळावा, यासाठी फांद्यापासून पारंब्या तयार होतात.

  • पारंब्या जमिनीपर्यंत जातात आणि नंतर वेगळ्या खोडात रूपांतरित होतात.

वटवृक्षांवरील पक्षी

  • मैना, बुलबुल, सातभाई, भारद्वाज, साळुंखी, तांबट, घुबड यांसारखे सुमारे २८ हून अधिक पक्षांचे तसेच वटवाघूळ, उदमांजर यांचे वास्तव्य असते.

  • हे पक्षी वडाची फळे खातात आणि त्यांच्या विष्टेतून वडाच्या बियांचा नैसर्गिक प्रसार होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT