सोलापूर : सोलापूरसह राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते, तो काय उद्योग, व्यवसाय, नोकरी करतो या बाबींची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे. अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून साधारणत: दोन ते अडीच महिने हा सर्व्हे चालणार आहे.
प्रत्येक दहा वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते, पण २०११ नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही. १४ वर्षे होऊनही देशाची, राज्याची लोकसंख्या किती वाढली? याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही. तत्पूर्वी, प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबाचा हा सर्व्हे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत, किती लोक काहीच काम करत नाहीत, याची माहिती समोर येणार आहे. या सर्व्हेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनांशी देखील चर्चा केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्व्हे सुरु होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
एप्रिल ते जूनपर्यंत चालणार सर्व्हे
प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे. त्यांना प्रत्येकी ३०० कुटुंबांचे टार्गेट देऊन हा सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. शाळांना सुटी लागल्यावर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली. या सर्व्हेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती, तरुण-तरुणी रोजगार, व्यवसाय, नोकरी करतात किंवा करत नाहीत हे स्पष्ट होईल. त्यानुसार कोणत्या घटकांसाठी शासनस्तरावरून उपाययोजना करता येतील हे निश्चित केले जाणार आहे.
गट करुन कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १० लाख कुटुंबांची आर्थिक गणना केली जाणार असून त्याचे नियोजन सुरू आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो, त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय, याचा सर्व्हे एप्रिलपासून केला जाणार आहे. अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या मदतीने हा सर्व्हे केला जाईल.
- दिनकर बंडगर, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सोलापूर
जिल्ह्यातील आर्थिक गणनेची स्थिती
अंदाजित एकूण कुटुंबे
१० लाख
सर्व्हेसाठी एकूण कर्मचारी
७०००
कर्मचाऱ्यास कुटुंबाचे उद्दिष्ट
३००
आर्थिक गणनेचा कालावधी
२ ते अडीच महिने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.