महाराष्ट्र

आगामी निवडणुका जिंकणे हे ध्येय - रावसाहेब दानवे 

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - ""सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित महागर्जना रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर ते "सकाळ'शी बोलत होते. सद्यःस्थितीतील आव्हानांबरोबरच त्यांनी भाजपची प्रारंभिक वाटचाल आणि आगामी दिशा यावरही विचार मांडले... 

प्रश्‍न - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शक्तिप्रदर्शनाचे प्रयोजन काय? 
दानवे - भाजपच्या स्थापनादिनी कुठून कुठवर आलो, याचे सिंहावलोकन करणे हे या मेळाव्याच्या आयोजनाचे कारण आहे. भाजप आज जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. भारतातील सर्वाधिक राज्यांत सत्ता असलेला आमचा पक्ष महाराष्ट्रातही सातत्याने जनतेने आपला मानला आहे. आम्ही निवडणुका जिंकतो आहोत कारण जनता आम्हाला आपले मानते. आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री, 13 महापौर, 12 जिल्हा परिषद अध्यक्ष , 98 नगराध्यक्ष, 5 हजार नगरसेवक, 563 जिल्हा परिषद सदस्य असे पदाधिकारी आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन आगामी वाटचालीसाठी संकल्प करणे हा मेळाव्याचा उद्देश आहे. 

प्रश्‍न - गेल्या काही महिन्यांत देशातील हवा बदलली आहे. सरकारविरोधी सूर तीव्रतेने व्यक्‍त होत आहेत... 
दानवे - (मध्येच तोडत) बहुतांश निवडणुका आम्ही जिंकत असताना देशातील परिस्थिती बदलली आहे, असे कसे म्हणता येईल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला अग्रेसर करणारी नीती अमलात आणली आहे. भारतीय जनता त्यांच्यामागे उभी आहे. सरकारचे निर्णय जनतेत पोचवणारे विशाल संघटन हे भारतीय जनता पक्षाचे बलस्थान आहे. लोकशाही व्यवस्थेत अन्य पक्षांना आपला प्रचार करायची मुभा असते, त्यामुळे ते वेगळे दावे करत असतील, तर तो त्यांचा हक्‍क आहे. आगामी निवडणुका आम्ही जिंकणार हे सत्य आहे. 

प्रश्‍न - आपण संघटन मजबूत आहे म्हणता; पण कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. त्यांना सत्तेचे लाभ मिळालेले नाहीत. चार वर्षे उलटून गेल्यानंतरही महामंडळे स्थापन झालेली नाहीत. 
दानवे - पक्षनेतृत्वावर विश्‍वास असलेले कार्यकर्ते हे भाजपचे सर्वांत मोठे बलस्थान. आमचे कार्यकर्ते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्षकार्यात स्वत-ला झोकून देतात. नवभारताच्या निर्माणासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. शिवाय महामंडळांवरील नेमणुकांचा मुद्दा आमच्यातील कोणीही प्रतिष्ठेचा केलेला नाही. तुम्ही म्हणता तशी नाराजी असतीच, तर प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांनी असे काम केले असते का? पक्षाला पुन्हा एकदा विजयापर्यंत नेण्यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. 

प्रश्‍न - गेल्या निवडणुकीत भाजपची घोषणा होती "मिशन 272'. या वेळी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणती घोषणा असेल ? 
दानवे - अशी घोषणा ठरवणे हे राष्ट्रीय स्तरावर होणारे काम आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यासंबंधात योग्य वेळी मार्गदर्शन करतील. 

प्रश्‍न - महाराष्ट्रात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदींची हवा बघून अनेक बाहेरची मंडळी भाजपमध्ये आली, आमदार झाली. बदललेली परिस्थती पाहून ही मंडळी बाहेर गेली तर ? 
दानवे - आमच्या पक्षात आलेली सर्व मंडळी भाजपमय झाली आहेत. ती बाहेर पडण्याचा प्रश्‍न नाहीच. उलट बाहेर असलेल्या अनेकांना पक्षात येण्याची इच्छा आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच याबाबतचे निर्णय घेतले जातील. 

प्रश्‍न - महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्ता आणता येत नाही. 
दानवे - यावर काय उत्तर देणार ? जे सत्य आहे, ज्यात तथ्य आहे ते समोर आहे. 

प्रश्‍न - शिवसेना सध्या भाजपवर फार नाराज आहे. आपल्या विशाल मेळाव्याबद्दल शिवसेनेला नेमके काय वाटत असेल ? 
दानवे - प्रत्येक पक्षाला स्वत-चा कार्यक्रम राबवण्याची मुभा असते. आम्ही महागर्जना रॅली घेतो आहोत, हा भाजपचा कार्यक्रम आहे. त्यावर कोणताही पक्ष आक्षेप का घेईल? शिवाय शिवसेनेची नाराजी म्हणाल, तर मी सांगेन, आम्ही दोन पक्ष म्हणून एकत्रितपणे सरकार चालवतो आहोत. सरकारमध्ये सामील असलेल्या दोन्ही पक्षांच्या मंत्रिसदस्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. चार वर्षे बरोबरीने निर्णय घेतले जात आहेत. पक्ष म्हणून त्यांचे कार्यक्रम, उपक्रम वेगळे असतील हे आम्हाला मान्य आहे. "एनडीए'त शिवसेना मित्रपक्ष म्हणून सामील झाला, आमची ही मैत्री कायम राहील, असा आम्हाला विश्‍वास आहे. 

प्रश्‍न - पण पक्ष नेतृत्वावर महाराष्ट्रात नाराजी आहे, असे म्हणतात... 
दानवे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी, दोघेही आपापली जबाबदारी पार पाडतो आहोत. सर्व मंडळी आम्हाला साथ देतात. महामेळाव्यात तुम्हाला याचा प्रत्यय येईलच. महाराष्ट्रातील सर्व नेते तेथे असतील. 

प्रश्‍न - एकनाथ खडसेही? 
दानवे - होय. तेही. मेळाव्याच्या जाहिराती पाहिल्या आहेत ना ? आमच्या पक्षाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. "दिये मे तेल नही' अशी अवहेलना आम्ही जनसंघाच्या काळत सहन केली. आज तेथून आम्ही सत्तेपर्यंत पोचण्याची वाटचाल "सबका साथ' घेत केली आहे. वसंतराव भागवत, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील अशा कित्येक जणांची यानिमित्ताने आठवण येते आहे. आमचा पक्ष सर्वांना घेऊन पुढे जाणारा आहे. ज्या मुंबई शहरात भाजपची स्थापना झाली, तेथे आम्ही कार्यकर्त्यांचा विशाल मेळावा घेतो आहोत. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वसुरींना नमन करीत भविष्याचे नियोजन करणाऱ्या या मेळाव्याला सर्व जण हजर असतील. 

प्रश्‍न - राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना या मेळाव्यानिमित्त प्रदेश भाजप काय भेट देणार ? 
दानवे - आगामी निवडणुकात देदीप्यमान यश मिळवून देणे हीच अमितभाई आणि पक्षनेत्यांसाठी सर्वांत मोठी भेट असेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवत भाजपला क्रमांक एकवर कायम ठेवणे यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. ही अमितभाईंसाठी सर्वांत मोठी भेट असेल अन्‌ भाजपच्या आगामी वाटचालीचे ध्येयही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT