मुंबई - विनयभंगाचा आरोप असलेले निलंबित पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. कथित विनयभंगाच्या मोबाईल चित्रीकरणाचा पंचनामा करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
मोरे यांनी परिचित अल्पवयीन मुलीचा तिच्या वाढदिवशी विनयभंग केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, विनयभंगाची घटना गेल्या वर्षी जूनमध्ये घडली होती. याबाबत पोलिसांनी डिसेंबरमध्ये ‘पॉक्सो’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित मुलगी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेली होती. तिने या चिठ्ठीत मोरे यांचा उल्लेखही केला होता. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तिला उत्तराखंडमधील डेहराडून येथून परत आणले. तेथे ती एका मित्रासोबत सापडल्याचे नवी मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पनवेल सत्र न्यायालयाने मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
या अर्जावर न्या. प्रकाश नाईक यांच्यापुढे शुक्रवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने मोरे यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आणि संबंधित मोबाईल क्लिपचा पंचनामा करून अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. २१) पुढील सुनावणी होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.