solapur city
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरातील २६ चौकांमध्ये सिग्नल असून सध्या त्यातील १४ सिग्नल सुरू आहेत. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत सुरू ठेवले जात आहेत. १२ ते १५ वर्षांपूर्वीचे सिग्नल आपोआप बंद पडत असून त्यातील वेळदेखील अचानकच कमी-अधिक होतो. त्यामुळे आपल्या बाजूचा ग्रीन सिग्नल लागल्याचे समजून पुढे जाणाऱ्या वाहनधारकांना अपघाताची भीती वाटू लागली आहे. सिग्नलवरच वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
सरस्वती चौकातील सिग्नल सकाळी साडेआठ वाजताच आपोआप सुरू होतो. अनेक वाहनचालक सिग्नल सुरू झाले समजून थांबतात. पण, त्याठिकाणी कोणताही वाहतूक अंमलदार नसतो. डफरीन चौक, महावीर चौक, आसरा चौकातील सिग्नल सुरू आहेत, पण ७० ते ९० सेकंद थांबलेल्या वाहनधारकाला जाण्यासाठी त्या सिग्नलवर अपेक्षित असलेली ‘हिरवी’ लाइट १५-२० सेकंदातच लागते. त्याचवेळी दुसऱ्या रस्त्यावरील वाहने त्यांच्या त्यांच्या मार्गाने ये-जा करत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमनासाठी असलेले सोलापूर शहरातील जुनाट सिग्नलमुळेच आता अपघाताची भीती वाहनधारकांना वाटू लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडी
मुख्य एसटी स्टॅण्डमधून सम्राट चौक-जुना कारंबा नाका येथून बस शहराबाहेर जात होत्या. पण, सकाळ व सायंकाळच्या सत्रात त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुले ये-जा करतात. त्यामुळे त्या मार्गावरील बस बंद कराव्यात, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे झाली. त्यानंतर आता सर्व बसगाड्या मुख्य स्थानकातूनच बाहेर पडतात. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकाला रिक्षांचा गराडा पडलेला असतो. रस्त्याच्या बाजूला हातगाडे आहेत. त्यामुळे या चौकात आल्यावर पुणे-मुंबईतील वाहतूक कोंडीची आठवण येते. त्याठिकाणी कायमचे दोन-तीन वाहतूक अंमलदार नेमावेत, अशी मागणी होत आहे.
जिल्हा नियोजन समितीतून मागितला निधी
सोलापूर शहरातील चौकांमधील सिग्नल खूप वर्षांपूर्वीचे जुने आहेत. ते अचानक बंद पडतात, त्यातील वेळा फिक्स राहात नाहीत. त्याची वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. पण, शहरातील प्रमुख २० चौकांमध्ये नवे सिग्नल असावेत, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मागितला आहे.
- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.