voting without voter
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांसाठी उद्या (शनिवार, ता. ७) सकाळी ७.३० ते ६.३० या काळात मतदान होणार आहे. मिनी मंत्रालयासाठी जिल्ह्यातील जिल्ह्यातील २ हजार ७५८ मतदान केंद्रावर २४ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत असून जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २७१ तर ११ पंचायत समित्यांच्या १३६ गणासाठी ४८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोच करण्यात आले आहे. एका मतदारास जिल्हा परिषदेच्या उमेदवारास एक आणि पंचायत समितीच्या उमेदवारास एक, अशी दोन मते द्यायची आहेत.
मतदान करायला जाताना मोबाईल ‘नो अलाऊड’
मतदान करताना बॅलेटचा फोटो, व्हिडिओ काढला जातो आणि आपण केलेले मतदान दुसऱ्यालाच गेल्याचा आरोप केला जातो. काहीजण तो फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित करतात. मतदानाचा अधिकार गोपनीय असून मतदारांना निर्भयपणे त्यांचा अधिकार स्वतंत्रपणे बजावता यावा, यासाठी मतदान करताना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. कोणीही मतदान केंद्रात जाताना मोबाईल घेऊन जाणार नाही, याची जबाबदारी मतदान केंद्रांवरील अधिकारी, पोलिसांवर असणार आहे. मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष वगळता तेथील अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यास किंवा उमेदवार प्रतिनिधींना मोबाईलचा वापर करता येणार नाही. केंद्राध्यक्षांनाही अत्यावश्यक कॉल आल्यास किंवा केंद्रावर काही अडचण आल्यास त्यांनी केंद्राबाहेर येऊन मोबाईल वापरायचा आहे.
...तर या कलमांनुसार गुन्हा
मतदारांची गुप्तता ही एक संवैधानिक हमी आहे, जी लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम १२८ अंतर्गत संरक्षित आहे. या गोपनीयतेचे कोणतेही उल्लंघन हा दंडनीय गुन्हा आहे. ज्यामध्ये तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे कोणीही मतदान (ईव्हीएमवर बटन दाबताना) करताना किंवा कोणाचा मतदान करतानाचा फोटो, व्हिडिओ काढून प्रसारित करू नये.
-----------------------------------------------------------------------
एकाच बॅलेटवर दोन्ही उमेदवार
मतदान केंद्रावरील एका बॅलेटवर १२ उमेदवारांची नावे, त्यांची चिन्हे असतील. सुरवातीला पांढऱ्या मतपत्रिकेवर जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील. त्याखाली गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवरील नावे ही पंचायत समितीच्या उमेदवारांची आहेत. मतदारांनी आपल्या पसंतीच्या दोन मतदारांना (जिल्हा परिषद एक आणि पंचायत समिती एक) मते दिल्यावरच ‘ईव्हीएम’वरील मशिनचा आवाज येईल आणि आपले मतदान यशस्वी होईल.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा...
मतदान केंद्रावर येताना मतदान कार्ड, आधार कार्ड यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र घेऊन जावे. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यावर बंदी असल्याने आपले सहकारी अथवा मोबाईल कक्षात ठेवावे. त्याचबरोबर पाणी बॉटल सोबत घेऊन जावे. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राज्य किंवा केंद्र शासन कर्मचाऱ्यांचे फोटो ओळखपत्र, बँक / पोस्ट ऑफिसचे फोटो ओळखपत्र, मनरेगाचे जॉब कार्ड (फोटोसह), पेन्शन पुस्तक / पेन्शन ओळखपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड (फोटोसह), शैक्षणिक संस्थेचे फोटो ओळखपत्र (विद्यार्थ्यांसाठी), अपंगत्व ओळखपत्र (फोटोसह) यांपैकी कोणतेही एक आणि त्यासोबत मतदान स्लीप, अपेक्षित आहे.
---------------------------------------------------------------------------------------
२ हजार ७४१ पोलिसांचा बंदोबस्त
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हा एकूण ६ हजार ७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये १८२ पोलिस अधिकारी, २४९० पोलिस, ३७४० होमगार्ड, एसआरपीएफच्या २ तुकड्या यांचा समावेश आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक मतदान केंद्रावर सात कर्मचारी
प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन पोलिंग ऑफिसर, एक पोलिस, असे सात कर्मचारी वर्ग राहणार आहे. प्रत्येक कर्मचारी आपापली जबाबदारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडावी लागणार आहे.
दोन मते दिल्यावरच बीप वाजणार
मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहणार आहे. यंदा ‘एक मत’ नव्हे तर जिल्हा परिषद गटासाठी एक आणि गणासाठी एक, अशी दोन मते द्यायची आहेत. दोन पूर्ण झाल्याशिवाय बीप वाजणार नाही. मत वैध ठरविण्यासाठी एक मत देऊन मतदार नोटाचे बटन दाबूनही आपली दोन मताची प्रक्रिया पूर्ण करू शकतो
उमेदवार केंद्राला तीन भेटी देऊ शकतो
एक उमेदवार एका मतदान केंद्रावर तीन वेळा भेटी अन् तीन जणांचे मतदान होईपर्यंत थांबू शकतो. उमेदवाराच्या प्रतिनिधीला आयोगाचे वेळापत्रक आवश्यक असून केंद्रात एका उमेदवाराला एकच प्रतिनिधी नियुक्त करता येणार आहे.
आकडे बोलतात...
एकूण मतदान केंद्र : २७५८
एकूण बॅलेट युनिट : ७५००
एकूण कंट्रोल युनिट : ३३६६
एकूण कर्मचारी : १३,९६४
जिल्ह्यातील मतदार
एकूण मतदान : २४ लाख ५९ हजार
पुरुष मतदार : १२ लाख ७७ हजार
महिला मतदार : ११ लाख ८२ हजार
इतर : ८३
निवडणूक निरीक्षक तुषार ठोंबरे सोलापुरात
निवडणूक निरीक्षक म्हणून पुणे विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक ठोंबरे हे सोलापुरात दाखल झाले असून ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात कार्यरत राहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३१६७७२० असा आहे. निवडणुकीबाबत काही तक्रारी किंवा आक्षेप असल्यास ठोंबरे यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.
---------------------------------------------------------------
सर्वांना सक्त सूचना...
मतदारांना मतदान करायला जाताना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार उमेदवार प्रतिनिधी असो की मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. तशा सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत.
- संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.