सोलापूर : रब्बीच्या पेरणीला सध्या जिल्ह्यात सुरवात झाली असून आता शेतीसाठी पाण्याची गरज आहे. उजनी धरणातून शेतीला साधारणतः १५ जानेवारीपासून पुढे ४० दिवस पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. पण, कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने धरणातील पाण्याचे नियोजन रखडले आहे. उजनी धरणात सध्या १२० टीएमसी (१०५ टक्के) पाणी आहे.
सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिकांखाली सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारी, गहु, मका, कांदा, हरभरा याशिवाय इतर तृणधान्याचीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पेरणी होते. आतापर्यंत जिल्ह्यात ८३ टक्क्यांपर्यंत पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. आता पावसाळा संपून दोन महिने झाले असून सध्या रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची गरज भासत आहे. अनेक शेतकऱ्यांना उजनीतून कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची प्रतीक्षा असून त्यांच्याकडून स्थानिक पातळीवर तशी मागणी देखील केली जात आहे.
दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रब्बी पिकांसाठी पहिले आवर्तन सोडले जाते. आता १५ जानेवारीपासून फेब्रुवारीअखेर पहिले आवर्तन सोडले जाण्याची शक्यता असून तसे नियोजनही जलसंपदा विभागाने केल्याचे समजते. यंदा एप्रिल ते मे या काळात शेती पिकांसाठी दुसरे आवर्तन सोडले जाईल. मात्र, धरणातील पाण्याचे नियोजन पालकमंत्र्यांच्या नेतृत्वातील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केले जाते. पण, अजूनही कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने शेतकऱ्यांना पिके वाचविण्याची चिंता लागली आहे.
भीमेतून पाणी सोडण्यासाठी महापालिकेचे पत्र
सोलापूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्यात आता एक महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा आहे. साधारणतः ४ जानेवारीपर्यंत औज बंधाऱ्यातील पाणी पुरणार आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीद्वारे ४ ते ५ जानेवारीपर्यंत पाणी पोचेल, अशा नियोजनाने पाणी सोडावे अशा मागणीचे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिले आहे. सोलापूर-उजनी संमातर जलवाहिनीचे काम जानेवारीत संपणार असून तेथून तीन महिने पाण्याचे प्रात्यक्षिक सुरू राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत नदीतून किमान दोन आवर्तने सोडावी लागतील, असे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
उजनीतील सध्याचा पाणीसाठा
एकूण पाणीसाठा
१२० टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
५६.३९ टीएमसी
पाण्याची टक्केवारी
१०५.२० टक्के
पहिले आवर्तन
१५ जानेवारीपासून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.