सोलापूर : जिल्ह्यात भाजपला सहापैकी पाच जागांवर यश मिळाले असून त्यातील एक आमदार पाचव्यांदा तर एक आमदार तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. दोन आमदार दुसऱ्यांदा आणि एक आमदार पहिल्यांदाच विधानसभेत एन्ट्री करणार आहे. पक्षाने २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख यांच्यावर सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यानंतर पुढील पाच वर्षांत जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही. होते. आता पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याने सोलापूरचा पालकमंत्री ज्येष्ठ आमदार होईल की नव्या दमाला संधी दिली जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सलग पाचव्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. तसेच सुभाष देशमुख यांनीही दक्षिण सोलापुरातून विजयाची हॅट्रिक साधली आहे. दोघेही आमदार अन्य तीन आमदारांना सिनियर आहेत. त्यांचे आपापल्या मतदारसंघात चांगले काम आहे. दोघेही २०१४च्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत. त्यावेळी सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाजपचे होते. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पराभूत करुन अक्कलकोटला भाजपचा बालेकिल्ला बनविले आहे. पंढरपूर-मंगळवेढ्यातही समाधान आवताडे यांनी पोटनिवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यांच्यामागे परिचारक यांची खंबीर साथ आहे. देवेंद्र कोठे यांनी तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेंचा बालेकिल्ला पहिल्याच निवडणुकीत काबिज केला आहे. शहर मध्य मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे. दरम्यान, २०१९ ते २०२४ या काळात अडीच वर्षे महाविकास आघाडी आणि अडीच वर्षे महायुतीची सत्ता असताना देखील सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरचेच होते.
सोलापूर जिल्ह्यात पाच आमदार असताना देखील जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही ठिकाणी पराभव सहन करावा लागला. विशेष बाब म्हणजे २०१४ ते २०१९ या काळात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समविचारी नेत्यांची आघाडी करुन जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपची एन्ट्री करुन दिली होती. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविण्यासाठी जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री आवश्यक आहे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे स्थानिक पालकमंत्री निश्चित आहे, पण पाच आमदारांपैकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे आता मिशन मिनी मंत्रालय
२०१४ ते २०१९ च्या पाच वर्षांत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना सोबत घेवून मिनी मंत्रालयात म्हणजेच जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपच्या मदतीने समविचारी अध्यक्ष निवडून दिला होता. आता आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. त्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक आमदाराकडे एक मंत्रीपद विशेषत: पालकमंत्रीपद आवश्यक आहे. जेणेकरुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपला वर्चस्व मिळविता येणार आहे. महापालिकेतही महायुतीत त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.