Atrocity
Atrocity 
महाराष्ट्र

शरमेने मान खाली (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

सांगली - आश्रमशाळेत ५ मुलींवर बलात्कार
निनाई आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेत पाच जणींवर बलात्कार व तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कुरळप पोलिसांना काल मिळालेल्या निनावी पत्रावरून आज पोलिसांनी चौकशी करीत अरविंद पवार व त्याला मदत करणारी स्वयंपाकीण मनीषा शशिकांत कांबळे (चिकुर्डे, ता. वाळवा, वय ४५) हिला अटक केली आहे. नराधम अरविंद पवार हा १९९० मध्ये शिवसेनेचा शिराळा तालुकाप्रमुख होता. कुरळप पोलिस ठाण्याचा पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

निनाई आश्रम शाळेला १९९६मध्ये मान्यता मिळाली. या शाळेत १ ली ते १२ वी पर्यंत ६५० विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी निवासी आहेत. यामध्ये मुलींचाही समावेश आहे. निनाई आश्रम शाळेत विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याचे निनावी पत्र आज कुरळप पोलिस ठाण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना साध्या वेशात शाळेत जाऊन घटनेची पडताळणी करण्यास पाठवले. पल्लवी चव्हाण यांनी शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधला. मुलींशी आपुलकीने बोलल्यानंतर त्यांनी शाळेत संस्थापकाकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. 

पोलिस उपाधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने प्रथम शाळेचा संस्थापक अरविंद पवार याला आज सकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा पवार, निर्भया पथकाचे कोमल पवार, वाळवा पंचायत समितीचे बाल प्रकल्प अधिकारी सुहास बुधावले यांच्यासह आश्रम शाळेवर छापा घातला. संस्थापक पवारच्या निवासी खोलीसह संस्थेचे कार्यालय सील केले. त्या वेळी अश्‍लील सीडी, उत्तेजक औषधे, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. त्यानंतर पोलिसांनीच पीडित मुलींच्या पालकांना घटनेची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलींची वैद्यकीय तपासणी चालू होती. 

शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.

मुंबई - रेपिस्ट जाळ्यात
मुंबई, नवी मुंबई आणि नालासोपारा येथे अल्पवयीन मुलींना हेरून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी विकृत नराधमावर बुधवारी नवी मुंबई पोलिसांनी झडप घातली. त्याला मीरा रोड येथील एका बारसमोर मुलींची रेकी करताना ताब्यात घेण्यात आले. 

नवी मुंबई पोलिसांनी महत्प्रयासाने गजाआड केलेल्या या आरोपीवर नवी मुंबई पोलिसांचे २५ हजार रुपयांचे बक्षीसही होते. या सीरियल रेपिस्टचा शोध मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर पोलिसही घेत होते. मुंबईसह नवी मुंबई पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विविध पथके तयार केली होती. रस्त्यावरून फिरणाऱ्या लहान वयाच्या एकट्यादुकट्या मुलींना हेरून त्यांना तो आई-वडिलांनी बोलावल्याच्या थापा मारायचा. त्यानंतर सोबत येणाऱ्या मुलींवर अत्याचार करून तो शहर सोडून जायचा. त्याच्या या गुन्ह्याच्या पद्धतीमुळे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता; मात्र खारघर, घणसोली व कोपरखैरणे येथे केलेल्या कृत्यांदरम्यान त्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. नवी मुंबई पोलिसांनी त्यावरून त्याचा शोध सुरू केला होता. नंतर त्याने शहरच बदलल्यामुळे तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यापासून दूर गेला होता. याचदरम्यान नालासोपारातील तुळींज भागात केलेल्या गैरकृत्यांमुळे पुन्हा नवी मुंबई पोलिसांचा तपास त्याच्या दिशेने सुरू झाला. त्याला गजाआड केल्यावर त्याच्याकडून विविध ठिकाणी केलेल्या कृत्यांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

मोबाईलवरून तपास 
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मोबाईल सिग्नलवरून या नराधमाचा शोध सुरू केला होता. बुधवारी दिवसभर मोबाईल टॉवरच्या सिग्नलवरून तो मीरा रोडमध्ये असल्याचे समजले होते. त्याच्या मागावर गेलेल्या पथकांना तो संध्याकाळी एस-९ परिसरात रस्त्यावर दिसला.

नगर - विवस्त्र केले
भानगाव (ता. श्रीगोंदे) येथे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली असून, अनुसूचित जमातीतील महिलेला विवस्त्र करून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.

पाळलेली शेळी शेतात घुसल्याने १२ सप्टेंबरला दुपारी तीनच्या सुमारास हे कृत्य करण्यात आले. वाघस्कर या कुटुंबाने या अनुसूचित जमातीतील कुटुंबातील पुरुषाला मारहाण करण्यास सुरवात केली. या वेळी पतीला वाचवायला गेलेल्या महिलेला या कुटुंबाकडून विवस्त्र करण्यात आले व मारहाण करण्यात आली. या वेळी या कुटुंबाकडून मदतीची याचना करण्यात येत होती. पण, त्यांना कोणीही मदत केली नाही. अखेर या महिलेने न्यायासाठी श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठले. पण, तेथे दखल न घेतल्याने अखेर ते कर्जत पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला?, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद
भानगाव येथे महिलेला विवस्त्र करून मारहाण झाली असल्याचा व्हिडिओ असूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. संबंधित महिलेचे कुटुंब तक्रार दाखल न करता निघून गेल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा आहे. मारहाण केल्याचा आरोप असलेल्या वाघस्कर यांची तक्रार घटनेच्या दिवशीच पोलिसांकडे दाखल आहे; तर संबंधित महिलेची तक्रार तीन दिवसांनंतर (ता. १४ सप्टेंबर) दाखल करून घेण्यात आली. यासंदर्भात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित महिला म्हणाली, ‘‘घटनेनंतर पोलिसांनी तीन दिवस तक्रार नोंदवून घेतली नाही. तुम्ही खोटी तक्रार दाखल करत आहात, तुमच्यावर अन्याय झालाच नाही असे पोलिस म्हणत होते...गुन्हा मागे घेण्यासाठी आम्हाला धमकावले जात आहे. आमचा मुलगा दुसरीला आहे. त्याच्यासमोर मला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. घटनेनंतर मुलगा शाळेत जातो तेव्हा त्यालाही चाकू दाखवून धमकावले जात आहे.’’

‘‘आम्ही १५-२० वर्षांपासून गावात राहतो. स्वतःची तीन साडेतीन एकर शेती आहे. आमच्याकडे शेळ्या नाहीत. आमचे कोणी नाही म्हणुन अशाप्रकारे मारहाण झाली. मला न्याय मिळाला नाही तर मी पोलिसांसमोर विष पिऊन आत्महत्या करेन,’’ असा इशारा संबंधित महिलेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT