Coffee With Sakal : कलाकृतीला बंधने नकोत!
Coffee With Sakal : कलाकृतीला बंधने नकोत!  
मनोरंजन

Coffee With Sakal : कलाकृतीला बंधने नकोत!

सकाळ वृत्तसेवा

ओटीटीवर अनेकदा शिवराळ भाषा किंवा बोल्ड सीन दाखवले जातात, असा आक्षेप घेतला जातो. मात्र, ओटीटीमुळे वास्तववादी चित्रण करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, मग ते का नाही वापरायचे, असा रोखठोक सवाल ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने केला. स्वत:च्या भूमिकेला न्याय देण्यासाठी इतर कलाकारांनीही स्वत:ला अशा बंधनात अडकवून ठेवायला नको, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. ‘प्लॅनेट मराठी’वर आलेल्या ‘अनुराधा’ वेबसीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांनीही कथानकाची गरज म्हणून असे दृश्य किंवा भाषा वापरावी लागते; त्याशिवाय कथेला न्याय देता येत नाही, असे सांगितले. ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये तेजस्विनी पंडित, संजय जाधव आणि ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक

अक्षय बर्दापूरकर यांनी अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या...

मराठीतील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करण्यामागे नेमकी संकल्पना काय होती?

अक्षय बर्दापूरकर : मराठीत दर्जेदार विषयांवर अतिशय उत्तम चित्रपट बनतात. मराठीमध्ये अनेक उत्तम दिग्दर्शक तसेच अभिनेते व अभिनेत्री आहेत; मात्र या सर्वांचं प्रमोशन, ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग बरोबर होत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर आपल्या कलाकृती पोहोचवण्यात आपण कमी पडतो. ही उणीव भरून काढण्यासाठी २०१७ मध्ये ट्विटरसोबत आम्ही मराठी चित्रपटांच्या प्रमोशन्ससाठी ‘प्लॅनेट मराठी’ हा नवा प्लॅटफॉर्म तयार केला. सुरुवातीला क्रिटिक शो, रिव्ह्यू करायचे ठरवले. त्यासाठी राजू परुळेकर, महेश मांजरेकर यांच्यासोबत काही शो केले. अशा पद्धतीने हळूहळू कंटेन्ट बनवत गेलो. मात्र इथेच थांबायला नको म्हणून प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आणि पहिलाच चित्रपट अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांना घेऊन ‘एबी आणि सीडी’ बनवला. खरं तर मी या चित्रपटाला अपघाताने जोडला गेलो. कारण काही परिस्थितीमुळे मला या चित्रपटाची निर्मिती करावी लागली. ही सुरुवात धमाकेदार होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच दिवशी लॉकडाऊन जाहीर झालं. आपला चित्रपट थिएटरमध्ये लागावा, ही माझी मनापासूनची इच्छा होती; मात्र लॉकडाऊन लांबतच गेला. नंतर ‘अॅमेझॉन’ने हा चित्रपट विकत घेतला. त्यामुळे मी गुंतविलेले पैसे मिळाले आणि विशेष म्हणजे हा चित्रपटही असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. त्याचदरम्यान मराठीतील जवळपास ७० ते ८० निर्मात्यांचे पैसे विविध चित्रपटांमध्ये अडकलेले होते; परंतु याबाबतीत मी नशीबवान ठरलो. त्यानंतर असं का झालं, हा विचार मी केला तेव्हा मला एकच उत्तर मिळाले आणि ते म्हणजे ओटीटी. दुसरं म्हणजे मराठीत तोपर्यंत एकही ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हता. त्यातच ‘समांतर’ या वेबसीरिजला मिळालेल्या प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला. मराठीत चांगला विषय दिल्यास लोक ते आवर्जून पाहतात, हे या वेबसीरिजने दाखवून दिले. त्यामुळे आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायचे ठरवले आणि ऑगस्टमध्ये आम्ही माधुरी दीक्षितला घेऊन प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे जोरदार लाँचिग केले. आता आम्ही ‘अनुराधा’ ही वेबसीरिज घेऊन आलो आहोत. आमच्याकडे उत्तम व अनुभवी दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री आहेतच; मात्र नवोदितांनाही संधी देण्याचा प्रयत्न अधिक करणार आहोत.

सध्या हिंदीबरोबरच मराठीतही महिलाप्रधान चित्रपट आणि वेबसीरिजची संख्या वाढत आहे. ‘अनुराधा’देखील तशीच वेबसीरिज आहे. या बदलांकडे कसे पाहता?

तेजस्विनी पंडित : आतापर्यंत महिलांची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या चित्रपटांना महत्त्व दिले जात नव्हते. अशा प्रकारचे चित्रपट चांगला व्यवसाय करू शकतील की नाही, याबाबत साशंकता होती. आता यामध्ये बदल होत आहे. विशेषत: हिंदीमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. मराठीत ते क्वचितच असतात. म्हणजे ‘मी सिंधूताई सपकाळ’ हा चित्रपट केला. त्यालाही आता दहा वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता ‘अनुराधा’ वेबसीरिजमध्ये वेगळे काही करण्याची संधी मिळत आहे. ताराराणी, भद्रकाली असे काही चित्रपट येत आहेत. हळूहळू बदल होत आहे; मात्र अजून आपल्याला फार पुढे जाण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या भूमिका करण्याची एक अभिनेत्री म्हणून माझी फार इच्छा आहे. कारण मराठीत अजूनही अभिनेत्रीला प्रामुख्याने घर सांभाळणारी, प्रेमळ, त्यागी किंवा खाष्ट अशा साचेबद्ध पद्धतीने दाखवले जाते. ते असेच का दाखवले जाते, हे मला अजूनही कळलेले नाही.

‘बॅन लिप्स्टिक’ आणि ‘अनुराधा’चे काय कनेक्शन आहे?

संजय जाधव : बॅन लिप्स्टिक ही कल्पना अक्षय बर्दापूरकर यांची. त्यांनी सांगितल्यानंतर ही कल्पना आम्हाला फार आवडली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या या कॅम्पेनला इतर सर्व अभिनेत्रींनीही पाठिंबा दिला. हिंदीमध्ये एका अभिनेत्रीच्या प्रोजेक्टसाठी इतर अभिनेत्री अशा पद्धतीने पाठिंबा देताना दिसणार नाहीत. मला वाटतं हे फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच होऊ शकतं; परंतु बॅन लिप्स्टिक आणि ‘अनुराधा’ यांचे कनेक्शन समजून घेण्यासाठी तुम्हाला वेबसीरिजच बघावी लागेल.

‘अनुराधा’ची कल्पना कशी सुचली?

संजय जाधव : खूप वर्षे हा विषय मनात होता; मात्र वेळ मिळत नव्हता. अखेर लॉकडाऊनने तो वेळ मिळवून दिला आणि त्यावर काम करता आले; मात्र वेबसीरिजचे नाव ‘अनुराधा’च का ठेवले, याचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला ही वेबसीरिजच पाहावी लागेल. ‘अनुराधा’ नावामागे एक गुपित दडलेले आहे.

‘अनुराधा’चा टीझर पाहिला असता तो बोल्ड वाटतो. मराठीतील या बदलांकडे तुम्ही कसे पाहता?

अक्षय बर्दापूरकर : मराठी प्रेक्षक मराठीतील बोल्ड कटेंट स्वीकारणार नाही किंवा अजून तेवढी त्यांची तयारी झाली नाही, असा अनेकांचा समज आहे. तो चुकीचा आहे. मराठीतही आता बदल होत आहे.

संजय जाधव : इतर भाषेतील चित्रपटांमधील बोल्ड कटेंट मराठी लोक स्वीकारतात. त्यामुळे मराठी ओटीटीलाही ते तसाच रिस्पॉन्स देतील, असे वाटते. आपण उगाचच आपल्याला प्रेक्षकांची नस कळते, अशा आविर्भावात प्रेक्षकांना काय आवडेल आणि काय आवडणार नाही, हे ठरवत असतो; पण मला वाटते ते प्रेक्षकांनाच ठरवू द्यायला हवे. ‘अनुराधा’चा टीझर रिलीज झाल्यापासून मला एकही नकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही किंवा तू हा शब्द कसा वापरलास, असा प्रश्न आतापर्यंत कोणी विचारला नाही.

ओटीटीवर अनेकदा गरज नसताना शिवराळ भाषा वापरली जाते, त्याबद्दल काय सांगाल?

संजय जाधव : ‘अनुराधा’मध्ये तसे तुम्हाला अजिबात आढळणार नाही. यातील कॅरेक्टर शिवी का देते, ते सिगारेट का पिते, याला निश्चित असे कारण आहे. ‘अनुराधा’ सीरिज बघितल्यानंतर कॅरेक्टरने शिवी का दिली, असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारल्यास, ते मी माझे अपयश समजेन आणि त्याला असा प्रश्न पडला नाही, तर ते माझे यश असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिग्दर्शकाचेही काही व्हिजन असते. तो उगीचच बोल्ड सीन वापरत नाही. ती कथानकाची गरज असते. त्याशिवाय कथा पुढेच जाऊ शकणारी नसते. त्यामुळे गरज नसताना बोल्ड सीन केले हा एक गैरसमज आहे. काही अपवाद असतीलही; मात्र बहुतांश कथेमध्ये तसे दृश्य फार गरजेचे असते.

तेजस्विनी पंडित : हिंदी, हॉलीवूडमधील बोल्ड सीन आपल्याला चालतात; मग मराठीसाठीच वेगळा चष्मा का? कदाचित आतापर्यंत आपल्याला असे काही पाहायची सवय नसेल; पण मला वाटते अभिनेते, अभिनेत्रींनीही स्वत:ला अशा बंधनात अडकवून ठेवायला नको. आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायला हवा. कारण मी ‘अनुराधा’ म्हणून एखादे दृश्य करते, तेव्हा मी तेजस्विनी नसते. मी त्या भूमिकेशी एकरूप झालेली असते.

तुम्ही सिनेमा, वेबसीरिजचे विषय कसे निवडता?

अक्षय बर्दापूरकर : ओटीटीचा सर्वांत मोठा प्रेक्षक ग्रामीण आहे. कारण शहरी भागातील नागरिक अत्यंत व्यग्र असतात. त्यामुळे प्लॅनेट मराठीचे धोरणच ग्रामीण भागातील प्रेक्षकांना अधिकाधिक जोडणे हे आहे. आता ओटीटीवर ग्रामीण भागातील विषय अधिकाधिक येतील. त्यांना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे आपण आताच मोठमोठ्या ओटीटींशी पैशांद्वारे स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे उत्तम विषय, दर्जेदार दिग्दर्शन, अभिनय या गोष्टींच्या आधारेच तुम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकता. विषय निवडताना याकडे लक्ष द्यावे लागते.

अभिनेत्री ते निर्माती हा प्रवास कसा झाला?

तेजस्विनी पंडित : निर्माता होणे सोपे नाही. कारण कलाकार फक्त चित्रीकरण, डबिंगला येतात. त्यानंतर त्यांचे काम संपलेले असते; मात्र निर्माता पेपरवर चित्रपटाचा श्रीगणेशा लिहिण्यापासून शेवटची कॉपी बनेपर्यंत त्या प्रक्रियेत पूर्ण सहभागी असतो. मीही आता तसाच अनुभव घेत आहे. निर्मात्याला काय काय परिस्थितींना तोंड द्यावे लागते, त्यांचा संघर्ष आता समजू शकते. त्यामुळे इतर निर्मात्यांसोबत अभिनेत्री म्हणून काम करतानाही त्यांच्या अडचणी समजून घेऊ शकते.

संजय जाधवसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?

तेजस्विनी पंडित : संजय जाधव यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला भेटायला येताना एकटे येत नाहीत. संपूर्ण टीम त्याच्यासोबत असते. त्यामुळे तो अनुभव फार छान असतो. तसेच हे आपले प्रॉडक्शन हाऊस आहे, अशी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाची भावना असते. त्यामुळेच संजय जाधव यांच्यासोबत प्रत्येकाला काम करायला आवडते.

संजय तू आतापर्यंत विविध कलाकारांबरोबर काम केले आहेस. एखाद्या कलाकाराची निवड करताना कधी फसगत होते का?

संजय जाधव : मला चित्रपटातून कोणतीही क्रांती करायची नाही की सामाजिक बदल घडवायचा नाही. मी किती उत्तम दिग्दर्शक आहे, हेदेखील मला दाखवायचे नसते. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन व्हावे, या हेतूनेच मी सिनेमे बनवतो. त्यामुळे कलाकारांची निवड करताना कधी फसगत होत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH : हैदराबादनं टॉस जिंकला अन् श्रेयस हसला; अहमदाबादमध्ये कमिन्स 'असा' हरला

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT