Bhupender Singh News
Bhupender Singh News esakal
मनोरंजन

...गर याद रहे

विश्राम ढोले vishramdhole@gmail.com

मुकेशसारखी पण थोडी कमी अनुनासिकता आणि हेमंतकुमारसारखी पण थोडी कमी सघनता यांचे छान मिश्रण भूपिंदर सिंग यांच्या आवाजात होतं. आज जुन्या गाण्यांवर अर्बेन आवाजाचा, शैलीचा आणि संगीताचा तडका मारणारे कव्हर व्हर्शन्स निघताहेत. भूपिंदर या अर्बेन व्हॉईस कल्चरचे मुख्य आणि बहुधा पहिले प्रवर्तक.

लता मंगेशकर नावाच्या सांस्कृतिक अद्भुताचं वर्णन करताना ‘मेरी आवाज ही पहचान है’ ही ओळ अनेकदा वापरली जाते. ती यथार्थही आहे. आसेतुहिमाचल वैविध्याने नटलेल्या देशात लताचा आवाज भारतीय स्त्रीत्वाची जणू नादरूप ओळख बनून गेला. इतर कोणत्याही गायक-गायिकेच्या वाट्याला असे भाग्य आले नाही. ‘मेरी आवाज ही पहचान है’ ही ओळ लतासोबत तेवढ्याच समर्थपणे गाणाऱ्या भूपिंदर सिंग यांच्या वाट्यालाही नाही. याचा अर्थ त्यांच्या आवाजाला व्यक्तिमत्व नव्हते असे नाही.

उलट हिंदी चित्रपटसंगीताच्या त्या काळात वैशिष्ट्यपूर्ण ठरावा असाच त्यांचा आवाज होता. मुकेशसारखी पण थोडी कमी अनुनासिकता आणि हेमंतकुमारसारखी पण थोडी कमी सघनता यांचे छान मिश्रण होतं भूपिंदर यांच्या आवाजात. त्यांच्यासाठी ‘रुत जवाँ जवाँ’ (आखरी खत) हे पहिलं सोलो बनविणाऱ्या खय्याम यांच्या शब्दात सांगायचं तर ‘उसकी आवाज में बडी मिठीसी गुनगुनाहट थी’. गायकीची शैलीही वैशिष्ट्यपूर्णच. कुठलीही घाई नाही. अट्टहासाने दाखविण्याचा सोस नाही. कृतक उसासे नाही. खोटे उमाळे नाही. एकेका शब्दाला, अक्षराला पुरेसी जागा आणि वजन देत शांतपणे सारे मांडायचे.

उत्साही, खेळकर सूर

अशा भावनांना स्पर्श करणारी भुपिंदर यांची गाणी खूप गाजली. निसर्गाच्या साक्षीने फुललेल्या प्रणयाचे स्मरणरंजन करणारे ‘दिल ढुंढता है’ (मौसम) आणि शहरी गर्दीतले एकाकीपणा सांगणारे ‘एक अकेला इस शहरमे’ (घरौंदा) ही त्याचीच उदाहरणे. तिच गोष्ट थोडीसी बेवफाईमधील ‘आज बिछडे है’ या गझलेची. त्यातील ‘कौन ढुंढे जवाब दर्दोंके, लोग तो बस सवाल करते है’ असे गुलजार यांचे शब्द, खय्याम यांच्या संगीताचे आणि भुपिंदर यांच्या आवाजाचे रुप लेवून येतात तेव्हा ते फक्त चित्रपटातील घटस्फोटीत पतीपत्नीपुरते मर्यादित रहात नाहीत. माणसं दूर जाण्याचा अनुभव घेणाऱ्या कोणाचीही व्यथा त्यातून व्यक्त होऊ लागते. पण संधी मिळाली तर हाच सूर तितकाच उत्साही, खेळकरही बनतो. ‘दिल ढुंढता हैं’चे युगलगीत किंवा ‘दो दिवाने शहरमें’ ऐका. एरवी गहनगंभीर वाटणाऱ्या भूपिंदर यांच्या सुरांमध्ये अशावेळी उत्फुल्लताही तितकीच दाटून येते.

गळ्यात आणि हातात जादू; १९६२ पासूनची प्रदीर्घ कारकिर्द, आरडी बर्मन-गुलजार यांच्यासारख्या प्रतिभावानांसोबतचे घट्ट नाते, मदनमोहन-खय्याम-जयदेव यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन असं बरंच काही सांगितिक संचित भुपेंद्र यांना लाभले. त्या तुलनेने त्यांच्या वाट्याला जेमतेम साडेतीनशे गाणी आली. सुरुवातीच्या काळात दिल्ली की मुंबई हे ठरविण्याच्या संभ्रमात काही संधी हातून गेल्या. सत्तरीच्या दशकात किशोरकुमारच्या अफाट लोकप्रियतेमुळेही भूपिंदर यांच्यासह अनेक गायकांच्या कारकिर्दीला मर्यादा पडल्या. तशाही परिस्थितीत सत्तरीच्या उत्तरार्धात त्यांची कारकिर्द बहरु लागली होती. पण ऐंशीच्या सुरुवातीलाच डिस्कोचे वादळ आले.

स्वस्तातल्या कॅसेटच्या तंत्रामुळे एकुणच जनप्रिय संगीतनिर्मिती व व्यवसायाची गणिते बदलली. हिंदी चित्रपटांची व्यवस्था आणि त्यातील सौंदर्यविषयक धारणा वेगाने बदलत गेल्या. ‘कौटुंबिक चौकटीतला रोमॅन्टिसिझम’ या मध्यवर्ती कथासुत्राला आव्हान मिळाले. जुनेजाणते कलाकारही पडद्याआड गेले. ऐंशीचे दशक हिंदी चित्रपटसृष्टीसाठी स्थित्यंतराचे दशक ठरले. अशावेळी शब्दप्रधान, स्वरप्रधान संगीताच्या मुशीत घडलेल्या, सत्तरीच्या दशकातील मध्यमवर्गी- मध्यममार्गी सिनेमातून अमोल पालेकर, संजीवकुमार उत्तमकुमार यासारख्या शहरी प्रतिमेच्या नायकांसाठी गायलेल्या भुपिंदर यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले. त्यांनी मग पत्नी मितालीसह स्वतंत्र गझलगायनावर आणि लाईव्ह कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत केले.

अर्बेन व्हॉईस कल्चरचे प्रवर्तक!

आवाजाचा पोत, गायनाची शैली आणि चित्रपटातील संदर्भ यामुळे भूपिंदर यांच्या आवाजाला ‘नागर’ किंवा ‘अर्बेन’ अशी ओळख मिळाली. ‘मास प्रॉडक्ट’ बनविण्याऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीला अशी विशिष्ट सांस्कृतिक ओळख मिळविणारे आवाज फक्त चवीपुरते लागायचे. आज संदर्भ खूप बदललेत. निश सिनेमाच्या आजच्या काळात नागर, अर्बेन आवाजाला मध्यवर्ती स्थान मिळतेय. जुन्या गाण्यांवर अर्बेन आवाजाचा, शैलीचा आणि संगीताचा तडका मारणारे कव्हर व्हर्शन्स निघताहेत. भूपिंदर सिंग या अर्बेन व्हॉईस कल्चरचे मुख्य आणि बहुधा पहिले प्रवर्तक. म्हणूनच ‘मेरी आवाजही पहचान है’ या ओळीवर भूपिंदर सिंग यांचाही अधिकार आहे. भूपिंदर यांच्याबाबतीत म्हणूनच ‘गर याद रहे’ ही दुसरी ओळही तितकीच लागू आहे.

(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT