वाळूज महानगर : वाळूज परिसरातील रांजणगाव, घाणेगाव, इटावा, जोगेश्वरी या परिसरात सोमवारी (ता. २०) सायंकाळी वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली; तसेच घाणेगाव येथील दोन शेतकऱ्यांच्या गायी दगावल्या. शिवाय कांदाचाळीसह शेतमालाचे मोठे नुकसान झाले.
वाळूज परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे रांजणगाव (शेणपुंजी), जोगेश्वरी, घाणेगाव, इटावा गावांसह शेतामधील अनेक झाडे उन्मळून पडली; तसेच घाणेगाव येथील पंचशीलनगर, संघर्षनगर येथे अनेकांच्या घरांवरील, कांदाचाळीवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले.
घाणेगाव येथील सागर सातपुते यांची एक गाय झाडाखाली दबून दगावली; तसेच माणिकराव गायके यांच्या कांदाचाळीच्या शेडवरील पत्रे उडाल्याने ते गायीला लागले आणि त्यात ती दगावली; तसेच इतर अनेक जनावरेदेखील जखमी झाली. पत्रे उडाल्याने व झाडे पडल्याने काही घरांच्या भिंतींचेही नुकसान झाले आहे. शकुंतला गायके यांचे सोलार पॅनल उडून नुकसान झाले. दत्तू बनकर यांच्या मोसंबीच्या बागेतील ६५ ते ७० झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले.
घाणेगाव येथे निर्जळी
सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह वादळी पावसामुळे अनेक वीजखांब कोसळल्याने पुरवठा खंडित झाला.
परिणामी घाणेगावातील पाणीपुरवठा बंद झाला. गावात मंगळवारी दिवसभर निर्जळी होती. अनेकांनी टँकरने पाणी विकत घेऊन तहान भागवली.
नुकसानीचे पंचनामे
घाणेगावात तलाठी संदीप पवार, ग्रामसेवक जी.एल. बोळशेकर, कृषी सहायक प्रमिला भांड, सरपंच केशव गायके, उपसरपंच सुधाकर गायके यांच्याकडून पंचनामा करण्यात आला. यामध्ये दत्तू बनकर, निवृत्ती काळवणे, लक्ष्मण काळवणे, ज्ञानेश्वर गायके, किशोर क्षीरसागर, राहुल गायके, सोपान गायके, संदीप काळवणे, किरण रोकडे, संजय दणके व निखिल गोपने यांच्या घरावरील पत्रे उडाल्याची नोंद आहे.
रात्रभर अंधार
वादळी वाऱ्यामुळे घाणेगाव परिसरात गट नंबर २४५, २४० तसेच नांदेड येथून येणाऱ्या मेन लाइनचे १० ते १५ वीजखांब कोसळले. यामुळे घाणेगाव येथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रात्रभर घाणेगाव येथे अंधाराचे साम्राज्य होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.