लातूर: जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करूनही कोरोनाचा मृत्यूदर (covid 19 death rate) कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात रुग्णसंख्या व मृत्यू वाढत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेने सोमवारपासून (ता. दहा) ग्रामीण भागात सक्रिय रुग्णशोध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत घरोघरी जाऊन कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोहिमेतून लक्षणे असलेल्या गंभीर परिस्थिती होण्यापूर्वी रुग्णांना उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. दहा) आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका आयुक्त अमन मित्तल व पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थित होते. श्री. गोयल म्हणाले, ‘‘लक्षणे दिसूनदेखील अनेकजण चाचणी व उपचारासाठी पुढे येत नाहीत. परस्पर डॉक्टरांना बोलून जुजबी उपचार घेतात. वेळ निघून गेल्यावर उपचारासाठी दाखल होतात. यामुळे त्यांच्यावर मृत्यूचे संकट ओढावत आहे. बहुतांश रुग्णांबाबत होणारा हा प्रकार बंद करण्यासाठी सक्रिय रुग्णशोध मोहीम सुरू केली आहे.
यात डॉक्टर, आरोग्य सेवक व आशा कार्यकर्तीकडून घरोघरी भेट देऊन सक्रिय रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे असलेल्यांची ऑक्सिजन व तापमान तपासणी होणार आहे. लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी करून गरजेनुसार उपचार करण्यात येणार आहेत. वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर गंभीर वेळ येण्यापू्र्वीच उपचार करण्याचे नियोजन मोहिमेत केले आहे. यातून कोरोनाचा प्रसार तसेच मृत्यूदर रोखण्याचे प्रभावी प्रयत्न आहेत. मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे.’’
हॉटस्पॉटमधील गृहविलगीकरण बंद
ग्रामीण भागात गृहविलगीकरणात असलेले रुग्ण काळजी न घेता बिनधास्त फिरत आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनाचा प्रसार वाढत आहे. याला आवर घालण्यासाठी मोठी रुग्णसंख्या असलेल्या हॉटस्पॉट गावांतील गृहविलगीकरण बंद करण्यात येणार असून, या रुग्णांना शाळा किंवा मंदिरात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत. तसे आदेश संबंधित यंत्रणांना दिल्याचेही श्री. गोयल यांनी सांगितले.
आजपासून ऑनस्पॉट लसीकरण
जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लस उपलब्ध झाली असून, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनस्पॉट नोंदणी करून ही लस देण्यात येणार आहे. कोव्हिशिल्ड लसीचे ३२ हजार तर कोव्हॅक्सीनचे बाराशे डोस उपलब्ध झाले आहे. यातून दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येणार असून कोव्हॅक्सीन लस केवळ दुसऱ्या डोससाठीच दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. शंभर टक्के लसीकरणाचा आराखडा केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये मदत केंद्र सुरू केले आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणीनुसारच लस देण्यात येणार आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार असून लोकांनी त्यासाठी संयम बाळगावा, असे आवाहन श्री. गोयल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.