बीड : जमीन घोटाळा तपासाचा गृहमंत्री घेणार आढावा
आज मंत्रालयात बैठक : वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलविले
बीड : जिल्ह्यातील हिंदू देवस्थान व वक्फ बोर्डाच्या जमिनींचे बनावट आदेशाच्या आधारे हस्तांतरणातील दोन प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. या प्रकरणातील तपासाचा मंगळवारी (ता. २२) स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आढावा घेणार आहेत. दुपारी मंत्रालयात यासंदर्भात बैठक होत असून यासाठी विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांसह स्वतः औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत.
जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांत देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी तत्कालीन भू-सुधार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट आदेशान्वये हस्तांतरित झाल्याचे समोर आले. दरम्यान, यात आतापर्यंत केवळ वक्फ बोर्डाच्या जमिनींसंदर्भातच गुन्हे नोंद झाले आहेत. यातील आष्टी तालुक्यात देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते, त्यानंतर बीड शहरातही वक्फ जमिनीशी संबंधित गुन्हे दाखल झाले आहेत. आष्टी तालुक्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपस करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी ) गठीत करण्यात आले होती. बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्याकडे एसआयटीचे पर्यवेक्षण देण्यात आले होते तर सहायक पोलिस आयुक्त पंकज कुमावत यांच्याकडे तपास अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. या प्रकरणात तीन दिवसांपूर्वीच एका नायब तहसीलदारासह मंडळ अधिकाऱ्यालाही अटक झाली आहे.
यापार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या प्रकरणातील तपासाचा आढावा घेणार आहेत. यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी ), बीडचे पोलिस अधीक्षक आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच देवस्थान जमीन घोटाळे प्रकरणांचा तपास एसआयटीकडे द्यावा, अशी मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले असून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र, सदर पत्रावर पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाने गृहमंत्रालयाला विचारणा केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.