हिंगोली : पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर एक ते १५ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविण्याच्या सूचना पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार उपक्रम राबविलेला अहवाल सादर करण्याचे कळविले आहे.
स्वच्छ भारत ग्रामीण मिशन अंतर्गत सुविधा उपलब्ध करून सवयींना प्रोत्साहन देऊन जनजागृती करणे, हा स्वच्छता पंधरवाड्याचा मुख्य उद्देश आहे. जलशक्ती मंत्रालय पेयजल व स्वच्छता विभाग नवी दिल्ली यांनी देशपातळीवर स्वच्छता पंधरवाडा राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एक ते १५ आॅक्टोबर या दरम्यान, पंचायत समिती अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन आॅक्टोबर रोजी स्वच्छता दिवस पाळावा, या कालावधीत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विविध स्वच्छता उपक्रम यामध्ये साफसफाई, केरकचरा, व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा संकलन करून त्याची व्हिलेवाट लावणे, वृक्ष लागवड, सार्वजनिक इमारतीची सफाई, नाली सफाई यासारखे उपक्रम राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
असा आहे पंधरवाड्याचा कालावधी
एक आॅक्टोबर रोजी उपक्रमाचे नियोजन करणे, दोन ते तीन आॅक्टोंबर स्वच्छता दिवस, चार ते पाच ऑक्टोबर कार्यालयीन परिसर व वृक्ष लागवड, सहा ते सात रोजी कार्यालयीन साफसफाई व श्रमदान, आठ ते नऊ रोजी कार्यालयीन परिसर प्लास्टिक कचरा संकलन व विल्हेवाट, दहा ते तेरा रोजी कार्यालयीन परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन व केरकचरा, नाली सफाई, तर १४ ते १५ आॅक्टोबरदरम्यान कोरोना प्रतिबंध हात धुवा कार्यक्रम असे स्वच्छता उपक्रम पंधरवाड्यात राबविण्यात येत आहे.
स्वच्छता पंधरवाड्याचा काय आहे मुख्य हेतू
मनुष्याची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वच्छ होणार नाही. हा बदल करण्यासाठी एक ते १५ आॅक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविले जात आहे. भारतात विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. तसेच भारतासारखी संस्कृती जगात दुसरी नाही. भारतातील संस्कृती, पर्यटन, भारताचा ऐतिहासिक ठेवा भारताची शान आहे, परंतु भारतातील सौंदर्याला गालबोट लागते ते अस्वच्छतेचे. प्रत्येकाने जर स्वच्छतेचा गुण अवलंबविला तर देश स्वच्छ होण्यास नक्की मदत होईल. घर, कार्यालय व आपला परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
यासाठी प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. सद्यस्थितीत पर्यटनस्थळी, बागेत, शाळा व कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता दिसते. ती दिसू नये यासाठी प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. शहरात जे चित्र आहे त्याहीपेक्षा वेगळे चित्र ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात. हे लक्षात घेऊन शासनाने हे अभियान राबविले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.