मुक्तपीठ

ब्रह्मांड - एक आठवणे

संजीव गोखले

‘ब्रह्मांड आठवणे’, ‘तोंडचे पाणी पळणे’, ‘पायात गोळे येणे’, ‘मटकन बसणे’, ‘जीव भांड्यात पडणे’ वगैरे शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकतो. कधीमधी त्यातल्या एखाद्याचा आपल्याला अनुभवही येतो; पण या सगळ्याच्या सगळ्या अवस्थांचा अनुभव पंधरा- वीस मिनिटांत येणे, हे तसे दुर्मिळच. 
गोष्ट तशी जुनी... वीस वर्षांपूर्वीची. आम्ही वडाळ्याला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत राहात होतो. आम्ही उभयता, माझी आई आणि आमची सव्वादोन- अडीच वर्षांची कन्या, रसिका. आईला मधुमेह असल्यामुळे चालणे तिच्यासाठी आवश्‍यक असायचे; पण तिला त्याचा विलक्षण कंटाळा. त्यामुळे रोज संध्याकाळी तीन जिने उतरून जबरदस्तीने पाठवावे लागे. रसिका ‘हायपर ॲक्‍टिव्ह’ आणि ‘हायपर टॉकेटिव्ह’ असल्याने ती दिवसभर तिच्या आईला सळो की पळो करून सोडत असे. मग मी संध्याकाळी घरी आलो, की रसिकाला घेऊन मला बाहेर पिटाळत असे. 

त्या दिवशीही आई, मी व रसिका फिरून परत आलो. योगायोगाने समोरच्या इमारतीतला सात- आठ महिन्यांचा झीशान त्याच्या अब्बांच्या कडेवर बसून खाली आला होता. फारच गोड मुलगा. त्याला कडेवर घ्यायचा मोह झाला. ‘चलो घुमने’ म्हणून सहज हात पुढे केला, तर आला पटकन. जिना चढणाऱ्या आईला मी हाक मारली आणि रसिकाला घरी घेऊन जायला सांगितले. इकडे ‘आजीबरोबर घरी जा’ म्हणून रसिकाला सांगितले आणि रसिका आजीबरोबर वर येतेय म्हणून गॅलरीत उभ्या असलेल्या सेवाला खूण करून सांगितले. मग रसिका जिना चढायला लागल्याचे पाहून मी झीशानला घेऊन इमारतीला चक्कर मारायला निघालो.

एवढीशी बिल्डिंग ती. आई संथ गतीने... थांबत- थांबत तीन मजले चढून दाराची बेल वाजवेपर्यंत मी परतही आलो होतो. झीशानला त्याच्या आजीच्या हवाली करून त्याच्या वडिलांशी बोलत थांबलो. इकडे बेल वाजली म्हणून सेवाने दार उघडले. आजीबरोबर रसिका नाही हे बघून तिने खाली मला हाक मारली आणि रसिका कुठे म्हणून विचारले. मी म्हटले ‘आईबरोबर वर आली.’

‘नाही, ती परत खाली गेली.’ ‘छे, खाली नाहीय ती!’
क्षणार्धात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. थोडक्‍यात... रसिका हरवली होती. ‘ब्रह्मांड आठवणे’ म्हणजे काय ते त्या क्षणी अनुभवले. पुढच्या सगळ्या घटना अतिशय वेगाने घडल्या. मी आणि झीशानच्या बाबांनी मोटारसायकली काढल्या. किक्‌ मारता मारता कोणी कोणत्या दिशेला शोधायला जायचे ते ठरवले आणि आम्ही शोधायला निघालो. दोघेही कॉलनी शोधून पाचच मिनिटांत परत आलो. इकडे रसिका हरवल्याचे लक्षात येताच सेवा चप्पलही न घालता तीरासारखी खाली धावली आणि टोचणाऱ्या खड्या-दगडांची पर्वा न करता तिला हाका मारत इमारतीच्या भोवती शोधून आली. आम्ही दोघे हात हलवत परतल्याचे पाहून मटकन खालीच बसली. एवढी लहान मुलगी कोणाच्या घरी जाईल ही शक्‍यताच नव्हती. डोक्‍यात नाना शंका येऊ लागल्या. कोणी पळवले तर नसेल, रेल्वे लाइनमध्ये तर गेली नसेल... कारण आमच्या कॉलनीच्या दोन्ही बाजूला रेल्वे लाइन्स होत्या.

एका बाजूला मध्य रेल्वेची हार्बर लाइन, तर दुसऱ्या बाजूला पोर्ट ट्रस्टचे रेल्वे यार्ड. रेल्वेची आठवण होताच आठवले, आमच्या इमारतीच्या मागच्या बाजूला हार्बर लाइनवरचा फूट ओव्हर ब्रिज होता आणि त्यावर चढायचा रसिकाला नाद होता. ही पुलावरून पलीकडे तर गेली नसेल? मी पटकन मोटरसायकल स्टॅंडवर लावली, झीशानच्या बाबांना यार्डात नजर टाकायला सांगितलं आणि पुलाकडे धाव घेतली. स्वतःचे जवळपास पंच्याऐंशी किलोचे वजन घेऊन धावत पूल चढणे सोपे नव्हते. पण त्या क्षणी मी तो पूल चढलो आणि तसाच पलीकडे गेलो. रेल्वे लाइनला लागून पलीकडच्या बाजूला लांबलचक झोपडपट्टी होती. धावता धावता मनात शंका... कोणी तिला पळवून झोपडपट्टीत तर लपवले नसेल? काळजाचा ठोका चुकला. मनावर अतोनात ताण घेऊन मी धावतच जिना उतरून पलीकडच्या छोट्याशा मैदानावर आलो आणि... हुश्‍श्‍श!

रसिका तिथल्या वाळूच्या ढिगावर खेळत होती. पटकन पुढे होऊन तिला उचलून कडेवर घेतले आणि तितक्‍याच वेगाने मागे फिरलो. पुलाच्या दुसऱ्या टोकाला सेवा डोळ्यांत प्राण आणून तिची वाट पाहात असणार याची मला कल्पना होती. पूल उतरून रसिकाला तिच्या हातात देताच तिला रडू फुटले. ‘‘बाळा, कुठे गेली होतीस?’’ सेवाने विचारले तर, म्हणते- ‘‘अगं, आपले बाबा हरवले होते ना, म्हणून मी शोधायला गेले होते.’’ 

पंधरा- वीस मिनिटांचा तो खेळ; पण त्या तेवढ्या वेळात काय काय आठवले आणि जिवाचे काय काय झाले हे आता शब्दातही पकडता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT