मुक्तपीठ

सणांची आठवण

संजीव लंगरकांडे

सिंगापूरच्या शंकराच्या मंदिरातही त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे उजळले जातात. सर्व परिसर प्रकाशाने उजळतो. मन उजळतं. त्या प्रकाशात मनातल्या साठवणीतील आठवणी उजळतात.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपोआपच पावले शंकराच्या देवळाकडे वळली. सिंगापूरमध्ये सगळ्या प्रमुख देवतांची मंदिरे आहेत, त्यातही पाया लेबारचे शिवमंदिर खूप प्रसिद्ध. देवळाची सजावट, उजळलेल्या वाती, घंटानाद... ते सर्व बघून लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळल्या. माझे पोरवय पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये गेले. पुण्यातल्या पेठांमध्ये संस्कृती जास्त जपली जायची, अजूनही जपली जात असेल. तर, त्या काळात चातुर्मासाची चाहूल लागायची. माझी आजी आमच्यासाठी दरवाजाला झोका बांधायची, त्यावर आम्ही कधी एकटे, तर कधी मी आणि मोठा भाऊ असे दोघे बसून झोके घ्यायचो, त्याचा आईला घरात ये-जा करताना त्रास व्हायचा. कारण टिचुकले स्वयंपाकघर. पण, आईने कधी जाणवू दिले नाही आणि कधी रागवायचीसुद्धा नाही.

पहिल्या श्रावणी सोमवारी शाळेला सुटी असायची. आजी आम्हाला शंकराच्या देवळात घेऊन जाई, कधी सिद्धेश्वराला, तर कधी नागेश्वराला. माझे काम म्हणजे आजीला बेल, दुर्वा, आघाडा, फुले आणून देणे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी फुलांबरोबर जिवतीचा कागद आणणे. त्यावर विविध देवांची चित्रे असायची. त्या चित्रांची पूजा श्रावणात केली जायची. नागपंचमीला दगडी नागोबाला भेट असायची.
श्रावणातले मोठे आकर्षण म्हणजे दहीहंडी. गल्या-गल्ल्यांमध्ये लहान- मोठ्या दहीहंड्या बघून खूप छान वाटायचे. मग शाळेतल्या इतर मित्रांबरोबर "आमच्या आळीतलीच दहीहंडी किती उंच आणि अवघड होती' यावर बढाया. माझ्या भित्र्या स्वभावामुळे म्हणा किंवा आईच्या धाकामुळे मी जरी कधी दहीहंडी फोडणाऱ्या कंपूमध्ये नसलो, तरी ती फोडताना येणारी मजा पाहण्यासाठी आम्ही पुढे. त्यात एकदा झालेली गंमत कधी न विसरण्यासारखी आहे. एक गोविंदा अगदी हंडीपर्यंत पोचला आणि त्याने ती फोडली; पण बाकीचे सगळे खाली कोसळले ते त्याची पॅन्ट ओढूनच. बिचारा बराच वेळ नागडाच त्या दोरीला लटकून राहिला.

आमच्या घरी गणपती बसत नसे; पण आपला शेजारसुद्धा अगदी घट्ट नातेवाइकांसारखा असायचा. शेजारी राहणारे जाधव कुटुंब गणपती- गौरी खूप श्रद्धेने करायचे. मग त्यांच्यासोबतच गणपती आणणे, विसर्जनाला जाणे, आरतीला जाणे चालायचे. गणेश चतुर्थीमध्ये वाड्यातल्या शक्‍य तेवढ्या आरत्यांना उपस्थित राहात असू. रात्रीचे जेवण झाले, की सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे बाहेर गणपती पाहायला जाणे, कधी घरच्यांच्या बरोबर, तर कधी वाड्यातल्या सवंगड्यांबरोबर. नवरात्रातल्या चतुःशृंगी यात्रेमध्ये एक खेळणे घेणे हा आमचा उद्देश; पण त्याआधी देवीचे दर्शन घेणे आवश्‍यक असायचे, पुन्हा आजी कडक असल्यामुळे पळवाट नसायची. तास तास रांगेत थांबावे लागे; पण खेळण्याच्या ध्यासात वेळ निघून जायचा. आमच्या घराच्या मागच्या वस्तीमध्ये रामलीला असायची, ती पाहताना पण खूप मजा यायची. ते पाहून आमचा अजून एक खेळ म्हणजे कुठून तरी काठ्या गोळा करायच्या आणि त्याचे धनुष्यबाण बनवून रामलीला खेळायची.

त्याकाळात वर्षातून दोनदाच नवीन कपडे मिळायचे, वाढदिवसाला आणि दिवाळीला. दिवाळीची पहिली खरेदी म्हणजे कपडे. शर्ट आणि पॅन्ट शिंप्याकडूनच शिवून घेतले जायचे. माझ्या भावाचे आणि माझे कपडे एकाच ताग्यातले असायचे. बऱ्याचदा शिंपी चुका करायचा. मग पुन्हा त्याच्याकडे अल्टर करायला चकरा. सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर संपला, की पहिले काम म्हणजे किल्ल्यासाठी माती शोधणे, पुण्यातील पेठांमध्ये कुठे ना कुठे तरी रस्ते खणलेले असायचेच किंवा बांधकामे चालू असायची. अशा ठिकाणांहून माती गोळा करून आणण्यात माझी आजीसुद्धा मदत करायची. आजी किल्ला बांधायलाही मदत करायची. त्यानंतर किल्ल्यावर ठेवायला लागणाऱ्या चित्रांची खरेदी. बहुधा मागल्या वर्षीचीच चित्रे असायची; पण त्यात दर वर्षी नवीन चित्रांची भर पडायची. हा सगळा बाजार फडके हौदाजवळ भरायचा. तिकडे आईची फराळाची तयारी चालायची. एक- एक पदार्थ तयार झाला, की त्याचे "टेस्टिंग' चालायचे. आजी देवाला दाखवल्याशिवाय एकही पदार्थ चाखू द्यायची नाही.

आकाशकंदील लावायचे काम सहसा वडिलांकडे. आमचे काम किल्ला सजवायचे आणि रांगोळी काढायचे. माझी बहीण छोटी असल्याने रांगोळीची जबाबदारी मी आणि माझा भाऊ पार पाडायचो. त्यामुळे रांगोळी काढायला अजून विसरलेलो नाही; पण केवळ कंटाळा म्हणून आजकाल काढत नाही. त्या वेळी एखाद्‌दुसरी गाय नेहमीच वाड्यातून फिरकायची, त्यामुळे तिचे कुणाला कौतुक नसायचे; पण वसुबारसेच्या दिवशी मात्र फार "डीमांड' असायचा तिला. तुळशीचे लग्न एक छोटे आकर्षण. त्यासाठी आधी भटजी गाठणे असायचे. कारण त्यादिवशी त्यांना फार मागणी. दुसऱ्या लग्नातून भटजींना ओढून आणण्याचे काम काही टारगट मुले करायची.

त्रिपुरारी पौर्णिमेला सिद्धेश्वराच्या मंदिरात मी आजीबरोबर वात जळेपर्यंत बसून राहायचो. आजही त्रिपुरारी पौर्णिमेला सिंगापूरला शंकराच्या देवळात जाऊन या आठवणींना उजाळा देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT