ठाणे: कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. नितीन पगारे असे त्याचे नाव आहे. राकेश साळुंखे (वय 30) नावाच्या व्यक्तीला त्याने रिव्हॉल्व्हर विकल्याचे उघड झाले आहे.
वर्तकनगर येथील उपवन तलावाजवळ एक जण शस्त्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून साळुंखेला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, पगारेकडून एक लाखात ही रिव्हॉल्व्हर घेतल्याचे त्याने सांगितले. यानंतर पगारेला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
कोण आहे राकेश साळुंखे?
राकेश साळुंखे हा रेल्वेमध्ये फॅब्रिकेशनचे कंत्राट घेतो. त्याच्यावर 20 लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्याने रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन देत फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्यासाठी रेल्वेची खोटी प्रमाणपत्रे, रबरी शिक्के बनवले. प्रत्येक उमेदवाराकडून तो दोन लाख घेत असल्याचे उघड झाले आहे. अशाप्रकारे त्याने 40 ते 45 जणांची फसवणूक केल्याची माहिती उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. फसवणूक झालेल्या व्यक्तींपासून संरक्षणासाठी त्याने पगारेकडून रिव्हॉल्व्हर घेतली होती. या प्रकरणात रेल्वेतील अधिकारी आहेत का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.