नेरळ : तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायतीत मागासवर्गीय १५ टक्के निधीतून साहित्य खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचे आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. त्यानंतर या विषयाचे पुरावे जमा करून सदस्य आरती सुनील सोनावळे व सुनील सोनावळे यांनी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच दामा निरगुडा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
याप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभिप्राय लक्षात घेत कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सरपंच दामा निरगुडा यांना निलंबित केले आहे.
सरपंचासह अनियमित रक्कम वसुली प्रकरणी ग्रामसेवकावरही शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे ममदापूर ग्रामपंचायतीला मोठा झटका मानला जात आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ विकास संकुल प्राधिकरणात समाविष्ट असलेली ममदापूर ग्रामपंचायत ही नेरळनंतर दुसरी मोठी ग्रामपंचायत समजली जाते. प्राधिकरणामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशातच ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीय १५ टक्के निधीमधून खरेदी केलेल्या साहित्यामध्ये अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते सचिन अभंगे यांनी माहिती अधिकारांतर्गत हा प्रकार उघडकीस आणला.
ममदापूर ग्रामपंचायतीने २०२०-२१ या वर्षात मागासवर्गीयासाठी १५ टक्के निधी खर्च करताना जनता भांडी भंडार यांना २ लाख ५२ हजार रुपये अदा केले होते, परंतु खरेदी करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने कोणतीही निविदा काढली नाही. या बिलावर जीएसटी क्रमांक नाही.
ममदापूरचे सरपंच व ग्रामसेवक यांनी २०१९- २०२० मध्ये १४ वा वित्त आयोगातून कृषी पुस्तके खरेदीसाठी १ लाख ५० हजार रुपये खर्च केल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही पुस्तके खरेदी केलेली नसून फक्त बिले लावण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीने बेरोजगार आणि बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी अनुक्रमे १० व १५ हजार इतका खर्च केला आहे. परंतू असे कोणतेही प्रशिक्षण दिलेले नाही.
दलित वस्तीमध्ये शिलाई मशिन पुरविणेसाठी १ लाख २९ हजार रुपये खर्च केला आहे. परंतु दलित वस्तीत कोणालाही शिलाई मशिन दिलेले नाही. मुलींना जन्म दिलेल्या महिलांना साडीचोळी देण्यासाठी ३० हजार रुपये खर्च केला आहे. परंतु प्रत्यक्षात एकाही महिलांना साडीचोळीचे वाटप झालेले नाही. ममदापूरच्या दलित वस्तीसाठी ५० केटरिंग टेबल खरेदी न करता माऊली ट्रेडर्स यांना १ लाख ७७ हजार ८०० रुपयांचे बिल अदा केल्याची नोंद आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामविकास निधीचा गैरवापर केल्याचे यातून समोर येत आहे.
ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतलेल्या सुनावणीत संबंधित अर्जदार व आरोपींचे म्हणणे ऐकून लेखी म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. तर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडूनही संबंधित प्रकरणावर अभिप्राय मागवण्यात आला होता.
संबंधित प्रकरणात सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पुराव्यांची छाननी केल्यावर कोकण आयुक्तांनी सरपंच दामा निरगुडा यांने निलंबन केले आहे. तसेच गैरव्यवहार झालेली रक्कम जबाबदार सरपंचासह ग्रामसेवकाकडून वसूल करतानाच ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ममदापूरमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. गैरव्यवहारामुळे गावाचा विकास खुंटला आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयामुळे नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रात नियोजनबद्ध विकासकामे झाली पाहिजेत, असा धडा मिळाला आहे.
- श्रावस्ती सचिन अभंगे, माजी सदस्या, ममदापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.