वीरपर्यंत दिवा-रोहा मेमूचा विस्तार होणार
पनवेल, नवी मुंबईतील रायगडकरांसाठी खासदार तटकरेंचा प्रयत्न
पनवेल, ता. २७ (बातमीदार) : कोकण रेल्वेच्या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी जमिनी दिल्या. मात्र, त्या बदल्यात त्यांना रेल्वेकडून सुविधा मिळत नाही. दिवा-रोहा मेमू सेवेच्या फेऱ्या कमी असल्याने स्थानिकांना एसटीचा पर्याय निवडावा लागतो. कित्येक महिन्यांपासून तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. परिणामी, खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत असल्याने खिशाला कात्री बसत आहे. त्यामुळे दिवा-रोहा मेमूचा वीर स्थानकापर्यंत विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पनवेल आणि नवी मुंबईतील रायगडकरांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने खासदार तटकरे यांनी रेल्वेला पत्र दिल्याने मेमूचा विस्तार होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असताना प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला मात्र रेल्वेने सापत्न भावाची वागणूक दिली आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी रायगडमधील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या; पण त्याचा फायदा फारसा झाला नाही. ज्या गाड्यांना रोहा किंवा माणगाव येथे थांबा दिला आहे, त्याने सकाळी मुंबईला येऊन काम आटोपून पुन्हा रात्री परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे रायगडवासीयांना लालपरीचाच आधार घ्यावा लागतो. खड्डेमय मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना शरीराच्या अनेक भागाला दुखापत होत असते. येथील नागरिकांना सोईस्कर गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. तसेच, या गाड्या वीर किंवा माणगावाहून सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे रायगडबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील नागरिकांनाही त्याचा फायदा होईल.
सध्या डेमू गाडी १२ डब्यांची असून, ती दिवा-रोहा चालवली जाते. ती गाडी १५ डब्यांची करून वीर स्थानकापर्यंत तिचे विस्तारीकरण करावे. याशिवाय, या गाडीच्या फेऱ्या वाढवणेही गरजेचे आहे. अलिबागसाठीही आर.सी.एफ. मार्गावरून शटल सेवा सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
सद्यस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने रायगड जिल्ह्यातून मुंबईला नोकरी-धंदा किंवा वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्यांना खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही. खासगी वाहनचालक दाम दुप्पट पैसे घेत असतात. यासाठी दिवा-रोहा मेमूच्या विस्तारासाठी खासदार सुनील तटकरे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी रायगडकर करत आहे.
दक्षिणेतील राज्यांनाच फायदा
दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांनाच याचा जास्त फायदा झाला. त्यांचा वेळ आणि पैसा वाचला. त्यांच्या राज्यात दर २० मिनिटांनी थांबणारी कोकण रेल्वे रायगडमध्ये मात्र थांबतच नाही.
कोकण रेल्वे तोट्यात नाही
कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या तोट्यात नाहीत. कोलाड स्टेशनवरून जाणाऱ्या रो-रो सर्व्हिसमुळे कोकण रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा फायदा होतो. या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. विद्युतीकरणाचे आणि दुहेरीकरणाचे जिल्ह्यातील काम पूर्ण झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने रायगड जिल्ह्यातून मुंबईला नोकरी-धंदा किंवा वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्यांना खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही. खासगी वाहनचालक जास्त पैसे घेत आहेत. सामान्य माणसाला ते परवडत नाही. त्यामुळे वीर स्थानकापर्यंत दिवा-रोहा मेमूचा विस्तार केल्यास रायगडबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व दापोली तालुक्यातील नागरिकांना त्याचा फायदा होईल.
- विनोद सापळे, स्थानिक रहिवासी
रायगड जिल्ह्यातील वीर स्थानकापर्यंत दिवा-रोहा मेमूचा विस्तार करण्यासाठी माणगाव परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे. त्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र दिले आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी खात्री आहे.
- सुनील तटकरे, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.