पावसामुळे धुरळ्यापासून दिलासा
पाली, ता. ८ (वार्ताहर) ः अवकाळी पावसामुळे बागायतदारांना व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे; मात्र वातावरणात गारवा वाढल्याने नागरिकसह पर्यटक सुखावले आहेत. उष्मा कमी झाल्याने वणवे लागण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. ३८ ते ४० अंश सेल्सिअसवर गेलेले तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस इतके खाली आले. यामुळे नागरिक तसेच पशुपक्ष्यांनाही उष्म्यापासून दिलासा मिळाला. वीज वितरणची सुरू असलेली कामे आणि भारनियमनामुळे पुरवठा खंडित झाला तरी उन्हाचा दाह कमी झाला आहे. पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पाणीही उपलब्ध झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी धुळीच्या वादळामुळे नागरिकांसह वाहनचालक, व्यापारी त्रस्त झाले होते; मात्र पावसामुळे धुरळा कमी झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांमुळे लगतच्या झाडांवर आच्छादलेली धूळ पावसामुळे नाहिशी झाल्याने झाडे हिरवीगार दिसू लागली आहेत.
पावसामुळे जंगल परिसरात लागलेले वणवे पूर्णपणे थांबले आहेत. वातावरणातील प्रदूषके खाली बसल्याने वातावरण स्वच्छ झाले आहे. उष्मा कमी झाला असून गारवा वाढल्याने माणसांसह पशुपक्षीही सुखावले आहेत. त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती काही दिवसांसाठी का होईना थांबली आहे.
- शंतनू कुवेसकर, निसर्ग व पशुपक्षी अभ्यासक
..................
पावसाने जनजीवन विस्कळित
रेवदंडा (बातमीदार) : तापमानाचा पारा वाढल्याने आठवड्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. घामाच्या धारांनी नागरिक हवालदिल झाले असताना बुधवारी (ता. ७) सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरण थंड झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून वीस तास उलटूनही पूर्ववत न झाल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. तर काही भागात अजूनही विजेचा लपंडाव सुरू आहे.
पावसाने लग्नसराई असलेल्या कुटुंबीयांची चांगलीच त्रेधातिरपीट उडालेली दिसते. सखल भागात पाणी साचल्याने रेवदंड्यातील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले आहेत. पावसाने हजेरी लावल्याने घरे शाकारण्याच्या कामाला वेग आला असून प्लॅस्टिक व ताडपत्री खरेदी वाढली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे दुग्धजन्य पदार्थ, औषधालय, उपाहारगृहे, शीतपेये विक्रेते, ब्युटी पार्लर आदी व्यवसायाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवाही बाधित झाल्याने आर्थिक व्यवहार संथ गतीने सुरू होते.
.................
वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
पोयनाड (बातमीदार) : पावसाने काही दिवसांपासून उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कामाच्या ठिकाणी आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसामुळे सुरक्षित निवारा शोधावा लागला. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने गावागावांमध्ये मंडप उभारण्यात आले आहेत. पावसाने हळदी आणि लग्नसमारंभाच्या ठिकाणी वऱ्हाडी मंडळींची दाणादाण उडवली.
-----------------
तळा तालुक्यात रात्रभर बत्ती गुल
तळा (बातमीदार) : वादळी पावसामुळे तळा शहर आणि ग्रामीण भागात सलग नऊ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी रात्री नऊ वाजता गेलेली वीज गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरळीत झाली. रात्र अंधारात काढावी लागल्याने उकाडा, डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांची झोपमोड झाली.
सकाळी काही वेळासाठी वीजपुरवठा सुरळीत झाला तरी वादळी वाऱ्यामुळे खांब कोसळल्याने पुन्हा काही भागात विजेचा लपंडाव सुरू होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांसह व्यापारी, कारखानदार, नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यावर तांत्रिक बिघाड नेमका कुठे झाला आहे, हे शोधण्यातच वेळ गेला. त्यानंतर पाबरा येथे बिघाड झाल्याचे लक्षात आल्यावर दुरुस्तीसाठी वेळ लागला.
.........
श्रीवर्धन ः ताशी ५० ते ६० किमी प्रति वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्याने श्रीवर्धन येथील जीवना बंदरात मच्छीमारी बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.
(छाया ः समीर रिसबूड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.