मुंबई

धोकादायक पर्यटनस्‍थळांवर बंदी

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : धबधब्यांच्या फेसाळलेल्‍या धारा अंगावर घेण्यासाठी पर्यटकांचा ओढा रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वाढू लागला आहे; मात्र याठिकाणी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हिणी घाट येथे मंगळवारपासून (ता. १७) पावसाळी हंगाम संपेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्‍यापासून आतापर्यंत पाच पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. त्‍यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना म्हणून बंदी आदेश लागू केला आहे.
अतिउत्साही पर्यटकांमुळे दरवर्षी दुर्घटना घडतात. जिल्‍ह्यातील बहुतांश धबधबे, तलाव दुर्गम परिसरात असल्‍याने आपत्कालात बचावकार्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो. दरवर्षी पावसाळ्यातील काही ठरावीक दिवसांसाठीच ही बंदी असायची; परंतु यंदा वाढलेल्‍या दुर्घटनांमुळे संपूर्ण पावसाळी हंगामासाठी बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. पावसाचा वाढलेला जोर पाहून इतरही स्थळांवर अंमलबजावणी केली जाणार आहे. यात काशिद, वरसोली, अलिबाग, हरिहरेश्वर यांसारखे समुद्रकिनारे, माथेरानमधील पर्यटनस्थळे, जिल्ह्यातील प्रमुख धरणांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली जाणार आहे. मंगळवारपासून बंदी घालण्यात आलेली माणगाव तालुक्यातील ही स्थळे अतिधोकादायक श्रेणीतील आहेत. तरीही हजारो तरुण-तरुणी निसर्गाचा थरार अनुभवण्यासाठी येत असल्‍याचे दिसते.
भिरा गावच्या हद्दीतील देवकुंड धबधबा, सणसवाडी गावाजवळचा सिक्रेट पॉइंट व ताम्‍हिणी घाट ही ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असून तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दोनच दिवसांपूर्वी आढावा घेतला. यात माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिलेल्या धोकादायक पर्यटनस्थळांच्या अहवालानुसार, प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

देवकुंड परिसरातील दुर्घटना
- २०१७च्या पावसाळी हंगामात चार पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्युमुखी पडले होते. तसेच सुमारे ५५ पर्यटक अचानक पाण्याचा जोर वाढल्याने नदीपात्रात अडकले होते.
- २०१८ मध्ये मनाई आदेशाची मुदत संपल्यानंतर तीन पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते.
- २०२२ मध्ये एक पर्यटक नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने बुडाला होता.

आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
माथेरान येथील शारलोट तलावात तीन दिवसांपूर्वी तीन तरुणांचा मृत्‍यू झाला. तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. रोहा तालुक्यात ठाणे येथून आलेला एक पर्यटक दारूच्या नशेत तलावात पोहण्यासाठी गेला असताना बुडाला. अशीच घटना श्रीवर्धन तालुक्यातही घडली आहे. मामाच्या गावाला आलेल्या भाच्याचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या सर्व घटना १५ दिवसांतील असून दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला.

पर्यटकांसाठी घातलेले निर्बंध
१. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करू नये, त्याचबरोबर मद्याचा साठा किंवा विक्रीस मनाई करण्यात आली आहे.
२. धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे, तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रील्स, व्हिडिओ बनवण्यास बंदी.
३. नदीची पातळी वाढल्‍यास, प्रवाह वाढलेल्‍या पाण्यात पोहण्यास बंदी.
४. धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली जाण्यास बंदी.
५. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जीवितहानी होईल, असे धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरण्यास मनाई.
६. रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवण्यास मनाई.
७. बेदरकार वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
८. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर  इतरत्र  फेकण्यास मनाई.
९. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे.
१०. असभ्य व अश्‍लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे.
११. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डिजे सिस्टिम वाजवणे, गाडीमधील स्पीकर वाजवणे व त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे.
१२. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जलप्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे.

अतिउत्साही पर्यटक स्‍वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. माणगाव तालुक्यातील ही स्थळे धोकादायक असल्याने निर्बंध घातले आहेत. दरवर्षी येथे दुर्घटना घडत असतात. बंदी कालावधी संपल्यानंतरही अशा घडत असल्याने यंदा संपूर्ण पावसाळी हंगामाकरिता निर्बंध घालण्यात आले आहेत. अतिउत्साही पर्यटकांमुळे प्रशासकीय यंत्रणेवरही मोठा ताण येत असतो. अशाच प्रकारे जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
- संदेश शिर्के, निवासी जिल्हाधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India responds strongly to Trump: ट्रम्प यांचे आरोप अन् टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला आता भारताचंही सडेतोड प्रत्युत्तर, म्हटले...

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

SCROLL FOR NEXT