विरार-बोळिंजच्या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाची एक खिडकी योजना
- घरखरेदीदारांना सर्व माहिती, आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : विरार-बोळिंज येथील जवळपास चार हजार घरे गेल्या सात-आठ वर्षांपासून विक्रीविना पडून असल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचा म्हाडाचा निधी अडकून पडला आहे. त्यामुळे विक्री न झालेल्या या घरांचा डोक्यावरील भार कमी करण्यासाठी म्हाडाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. तरीही घरांच्या विक्रीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता घरांच्या विक्रीसाठी आणि घरखरेदीदारांना सदर घरांची सहज माहिती मिळावी, आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत म्हणून म्हाडा मुख्यालयात एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे घर घेण्यास इच्छुक असलेल्यांना सहजपणे विरार-बोळिंजच्या घरांची माहिती मिळू शकणार आहे.
म्हाडाने उभारलेल्या घरांच्या विक्रीसाठी संबंधित मंडळाकडून जाहिरात काढली जाते. त्यानुसार कोकण मंडळाकडून २०१६ पासून वेळोवेळी बोळिंजच्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरीत समावेश केला जात आहे. त्याला प्रतिसाद कमी मिळत असल्याने आजही मोठ्या प्रमाणात घरे पडून आहेत. त्यामुळे आता म्हाडातर्फे घरांच्या विक्रीसाठी, घरांची माहिती देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. घरखरेदीदाराला फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी घराची किंमत, क्षेत्रफळ, कागदपत्रे, किती दिवसात पैसे भरावेत, कर्जासाठी म्हाडाकडून दिली जाणारी एनओसी आदी सर्व माहिती एकाच ठिकाणी दिली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती कोकण मंडळाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दर्शनी भागात एलईडी स्क्रीन
म्हाडामध्ये दररोज तीन-चार हजार लोक वेगवेगळ्या कामाने येतात. मुंबईलगत असलेल्या बोळिंजच्या घरांची त्यांना माहिती नाही. त्यामुळे म्हाडा कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला सहजपणे बोळिंजच्या घरांची माहिती मिळावी, यासाठी लवकरच कार्यालयाच्या आवारात दर्शनी भागात मोठा एलईडी स्क्रीन लावण्याची योजना आहे. या एलईडीवर बोळिंजच्या घरांची सर्व माहिती सातत्याने दाखवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१५ टक्के सवलतीचा पर्याय
विरार-बोळिंज येथील घरांच्या किमती २१ लाखांच्या घरात आहेत. एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीसमूहाने १०० किंवा त्यापेक्षा जास्त घरांची एकगठ्ठा खरेदी केल्यास एकूण किमतीवर १५ टक्क्यांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संस्था, कंपन्यांकडून सदर घरांच्या खरेदीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
सुलभ हप्त्याच्या पर्यायावर विचार सुरू
म्हाडाने सुलभ हप्त्याने घरांची विक्री करता येईल का, या पर्यायावर म्हाडाकडून विचार सुरू आहे. या पर्यायानुसार एखाद्या व्यक्तीने घर खरेदी केल्यास २५ टक्के रक्कम भरावी लागेल, तर उर्वरित रक्कम समान हप्त्यांद्वारे वसूल केली जाणार आहे.
विरार-बोळिंज येथील विक्री न झालेली घरे विकण्याचा सर्व टप्प्यावर प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून घरांची सर्वसामन्यांना सहजपणे माहिती मिळावी, यासाठी लवकरच एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे.
- अनिल अंकलगी,
मुख्याधिकारी, कोकण मंडळ (म्हाडा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.