मुंबईकरांच्या घरात हरित ऊर्जेचा प्रकाश
टाटाकडून आठ लाख ग्राहकांना ४० टक्के सौर, पवनऊर्जेचा पुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबापुरीतील टाटा पॉवरच्या ४० टक्के ग्राहकांच्या घरात सौर, पवन आणि लघु जलविद्युत प्रकल्पात तयार होणाऱ्या वीज प्रकल्पातील विद्युत पुरवठा होतो. टाटा पॉवरने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मुंबईतील आठ लाख ग्राहकांना सुमारे पाच हजार ९७२ दशलक्ष युनिट विजेचा पुरवठा केला आहे. त्यामध्ये हरित ऊर्जा प्रकल्पातून घेतलेल्या तब्बल २,३८९ दशलक्ष विजेचा समावेश आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरकडून ग्राहकांना केल्या जाणाऱ्या हरित ऊर्जेच्या पुरवठ्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे.
कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जाळावा लागतो, यामुळे हवेचे प्रदूषण होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपन्यांना अपारंपरिक वीज प्रकल्प म्हणजे सौर, पवन आणि लघु जलविद्युत प्रकल्पातून ठरावीक वीज घेणे बंधनकारक केले आहे. २०२४-२५ साठी २९.९१ टक्के इतक्या हरित ऊर्जा वितरणाचे उद्दिष्ट होते; मात्र टाटा पॉवरने आपल्या एकूण वीज वितरणच्या तब्बल ४० टक्के वीज हरित वीज प्रकल्पातून घेत आपल्या आठ लाख ग्राहकांना पुरवठा करीत सामाजिक जबाबदारी निभावली आहे. कंपनीने वितरित केलेल्या २३८९ दशलक्ष युनिट हरित विजेमध्ये १६६५ दशलक्ष युनिटपेक्षा जास्त अक्षय ऊर्जा व ७२४ दशलक्ष युनिट जलविद्युत ऊर्जा पुरवठ्याचा समावेश आहे.
भविष्यात मोठी वाढ होणार
मुंबई उपनगरात टाटा पॉवरचे तब्बल आठ लाख वीज ग्राहक असून त्यापैकी तब्बल ५० हजार ग्राहक निव्वळ हरित ऊर्जेचा वापर करीत आहेत. सर्वसाधारण वीजदराच्या तुलनेत प्रतियुनिटमागे ६५ पैसे जादा मोजले आहेत. दरम्यान, वीज आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार हरित ऊर्जा वापराच्या वीजदरात २५ पैशापर्यंत कपात केली आहे. त्यामुळे भविष्यात हरित ऊर्जा वापरात मोठी वाढ होऊ शकणार आहे.
कमी कर्बन उत्सर्जनाचे लक्ष
देशाच्या आर्थिक राजधानीला विश्वासार्ह, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा पुरवण्यासाठी टाटा पॉवर कटिबद्ध आहे. मुंबईची कमी कार्बन भविष्याकडे वाटचाल सुरू असताना, शहरासाठी सक्षम आणि मजबूत ऊर्जा परिसंस्था उभारण्यात टाटा पॉवरचा मोठा वाटा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.