कोविडसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
प्रत्येक जिल्ह्यात ‘सीसीबी’ सुरू होणार
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्यात कोविड महामारीसारख्या परिस्थितीसोबत लढताना राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. अनेक रुग्णांना आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध झाली नव्हती. रुग्णांना आयसीयू उपलब्ध होत नव्हते; पण आता राज्य आरोग्य व्यवस्था सज्ज होते आहे. येत्या काही काळात उपचारांसाठी इतर जिल्ह्यांवरील अवलंबित्व कमी होण्यासाठी मदत होणार आहे. याअंतर्गत ३६ जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक क्रिटिकल केअर ब्लॉक उभारले जात आहेत.
क्रिटिकल केअर ब्लॉकमुळे गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारांसाठी कमी धावपळ करावी लागेल. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम-अभीम) अंतर्गत महाराष्ट्रात आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी ३६ जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर ब्लॉक (सीसीबी) बांधले जात आहेत. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता वाढवणे आणि संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावादरम्यान जलद उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा या ब्लॉकचा उद्देश आहे. चांगल्या आरोग्य सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आयसीयू खाटेसाठी फिरावे लागते. अशा परिस्थितीत संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या गंभीर रुग्णांना त्यांच्याच जिल्ह्यात सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी सीसीबी तयार केले जात आहेत.
...
प्रत्येक जिल्ह्यात किमान ५० खाटा
१. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्यात ५० खाटांचे सीसीबी तयार केले जाईल. ५ ते २० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ५० खाटा आणि २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये १०० खाटा असतील.
२. सीसीबीमध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू), उच्च अवलंबित्व विभाग (एचडीयू), आयसोलेशन वॉर्ड, डायलिसिस सुविधा, ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, माता-बाल कक्ष आणि आपत्कालीन सेवांचा समावेश असेल. आतापर्यंत नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, नांदेड, बीड, अकोला, जालना आणि लातूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये बांधकाम सुरू आहे.
३. सिंधुदुर्ग, पनवेल (ठाणे), गोंदिया अशा काही जिल्ह्यांमध्ये कामाचे आदेश देण्यात आले आहेत किंवा निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांची मान्यतादेखील मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रातील साथीच्या आणि आपत्कालीन आरोग्य परिस्थितींना हाताळण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.
....
वर्षाअखेरीस सर्व ब्लॉक कार्यान्वित होणार
सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन आंबेडकर म्हणाले, की राज्य सरकार आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहेत. या वर्षाच्या अखेरीस राज्यातील सर्व प्रस्तावित क्रिटिकल केअर ब्लॉक पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.