वाहतूकदारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत २० टक्के घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : अन्यायकारक ई-चालानसह इतर अन्यायकारक कारवायांच्या विरोधात राज्यातील अवजड वाहतूकदारांचा बुधवारपासून बेमुदत संप सुरू झाला. पहिल्या दिवशी मुंबईत संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत २० टक्के घट नोंदविण्यात आली.
महाराष्ट्रातील मालवाहतूक संघटनांनी ई-चालान प्रणालीद्वारे होणाऱ्या दंडवसुलीविरोधात आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. परिवहन विभागाने मागण्यांवर ठोस उपाययोजना न केल्याने वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, प्रवासी वाहतूक आणि शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी तूर्तास संपातून माघार घेतली आहे. दोन दिवसांनंतर संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या संपामुळे राज्यातील अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले आणि औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संपाबाबत वेळीच तोडगा न निघाल्यास अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहे.
====
मालवाहतूकदारांच्या संपामुळे मुंबईत जवळपास ५० टक्के वाहने बंद आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत २० टक्के घट झाली आहे. हा संप सुरू राहिल्यास जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.
- राजेंद्र वणवे , अध्यक्ष, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशन
====
मालवाहतूकदारांच्या संपाबाबत परिवहनमंत्र्यांसोबत चर्चा झाली, परंतु चर्चेत तोडगा न निघाल्याने संप कायम असणार आहे.
- उदय बर्गे, अध्यक्ष, मालवाहतूकदार बचाव समिती
====
वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक ः सरनाईक
वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. राज्य सरकार त्यांच्याबाबत सकारात्मक आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांनादेखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देता येईल. त्यामुळे वाहतूकदारांनी उपोषण आणि संप करू नये, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. विधानभवनात सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह वाहतूकदारांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, की वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये टँकर वाहतूकदार व इतर वाहतूकदारांच्या प्रतिनिधींचाही समावेश केला जाईल. राज्याचा व्यापार-व्यवसाय वाढविण्यात वाहतूकदारांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना संरक्षण देणे हे सरकारचे काम आहे. परिवहन विभागाचे तपासणी नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये, या दृष्टीने पोलिस आणि परिवहन विभागाला सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.