लालपरीत प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
अनेक बसमधील प्रथमोपचार पेट्या रिकाम्या
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : ‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत प्रवासी सेवा देणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी हजारो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहे; मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे लालपरीचा प्रवास असुरक्षित ठरत आहे. एसटीच्या अनेक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या रिकाम्या असल्याचे ‘सकाळ’ने मुंबई सेंट्रल बसस्थानकात केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
वाहतूक नियमानुसार, एसटीमध्ये प्रथमोपचार पेटी, आग प्रतिबंधक यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे. अनेक बसगाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणेची सुविधा आहे. आपत्कालीन परिस्थितीत किंवा अपघात झाल्यास प्राथमिक उपचार करता यावेत, यासाठी प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे बसवण्यात आली आहे; मात्र सध्या अनेक बसमधील या पेट्या रिकाम्या आहेत, तर काही बसमधील पेट्या गायब झाल्या आहेत.
===
अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष
प्रत्येक बसमध्ये अग्निशमन यंत्रणा अत्यावश्यक असताना, एक-दोन बसमध्ये तीदेखील दिसली नाही. याकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन यंत्र बसविण्याची आणि ती सुस्थितीत असल्याची खात्री करणे गरजे आहे.
==
‘सकाळ’च्या पाहणीत काय दिसले?
१. मुंबई ते चिपळूण
बस क्रमांक
एम एच ०९ एफ एल १०५७
प्रथमोपचार पेटी रिकामी
--
२. मुंबई ते मुरूड
बस क्रमांक
एम एच २० बी एल ३९०१
प्रथमोपचार पेटी रिकामी
--
३. मुंबई ते उमरगा
बस क्रमांक
एम एच १४ एल बी ०२४३
प्रथमोपचार पेटी रिकामी
अग्निशमन यंत्रणाही नाही
==
प्रथमोपचार पेटी का महत्त्वाची?
प्रवासात एसटीचा अपघात झाल्यास, रुग्णालयात पोहोचेपर्यंत प्रथमोपचार करता यावेत, अधिक रक्तस्राव होऊ नये, जंतूसंसर्ग होऊ नये किंवा प्रकृती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी प्रथमोपचार पेटी आवश्यक साहित्यांसह बसमध्ये असणे महत्त्वाचे आहे.
==
प्रथमोपचार पेटीमध्ये काय असावे?
जंतूनाशक
कापूस
मलमपट्टी
कात्री
वेदनाशाम औषधे
मलम
===
अलीकडचे एसटी अपघात
- १४ फेब्रुवारी २०२५ : धाराशिव येथे बसला आग; खिडकीतून उड्या मारल्याने ७० प्रवासी बचावले
- २ मार्च २०२५ : अकोला येथे धावत्या बसला आग; बस खाक , २० प्रवासी बचावले
- ४ मे २०२५ : नगर-पुणे मार्गावर बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले
- ९ मे २०२५ : रायगड जिल्ह्यात बस अपघातात चार मृत्यू, २० जखमी
- १३ मार्च २०२५ : परळ येथील बस अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी
- ११ जुलै २०२५ : मुंबई-पुणे महामार्गावर एसटी अपघात; चालकाचा मृत्यू, वाहकासह नऊ जण जखमी
===
एसटीमध्ये प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. प्रथमोपचार पेट्या रिकाम्या असल्यास, संबंधितांना जाब विचारण्यात येईल. तसेच बसमध्ये तत्काळ प्रथमोपचार पेट्या लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात येतील.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
====
दररोज लाखो लोक एसटीने प्रवास करतात. प्रवास लांबचा असो किंवा जवळचा, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये.
- दीपक चव्हाण, अध्यक्ष, गणेशभक्त कोकण प्रवासी संघटना
---
एसटीकडील बस ताफा (१० एप्रिलपर्यंत)
लालपरी - १२९८०
इलेक्ट्रिक बस - २१७
मानव विकास - ८७१
निम आराम - १९९
वोल्वो वातानुकूलित शिवनेरी - ७३
ई शिवनेरी - ९७
मिडी सेवा (यशवंती) - २२
वातानुकूलित शिवशाही सेवा - ८८६
साध्या आसनी व शयनयान - २११
साध्या शयनयान - ५२
शिवाई - ४७
एकूण प्रवासी वाहने - १५६५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.