हनी ट्रॅपच्या चर्चेने राज्यभरात खळबळ
पोलिसांचा अधिकृत दुजोरा नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्यातील ७२ शासकीय अधिकारी, राजकीय पुढाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून धमकावण्यात आले. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून हवी ती कामे करवून घेण्यात आली. या चर्चेला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी यामुळे मंगळवारी दिवसभर राज्यातील शासकीय, राजकीय वर्तुळावर खळबळ उडाली.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने सोमवारी संध्याकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये हनी ट्रॅपचा विषय पुढे आला. या वेळी गप्पांमध्ये सहभागी असलेल्यांनी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये उतरणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांसह राजकीय पुढारी, आजी-माजी मंत्र्यांचे नको त्या अवस्थेतील व्हिडिओ चोरून काढण्यात आल्याचे सांगितले. पुढे ते व्हिडिओ संबंधितांना दाखवून ब्लॅकमेल करण्यात आले. व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून आमची ही कामे करा, असे सांगत कामांची जंत्रीच त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आणि ती करवूनही घेण्यात आली, अशा आशयाची खमंग चर्चा इगतपुरीत रंगली. या चर्चेत काही ठरावीक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचाही उल्लेख झाला; मात्र त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे पुढे आले नाहीत. नाशिकमधील ज्या हॉटेलचा उल्लेख या चर्चेत होत आहे, त्याचे मालक पूर्वाश्रमी एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांचे कुटुंबदेखील राजकारणात सक्रिय आहे. विशेष म्हणजे ज्या राजकीय नेत्यासमोर ही चर्चा रंगली, त्यानेही यापूर्वी नाशिक दौऱ्यावेळी याच हॉटेलमध्ये वास्तव्य केल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भातील बातम्या मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्याच्या राजकीय, शासकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली. अनेक अधिकाऱ्यांमध्ये ‘त्या’ ७२ जणांमध्ये कोण होते, हॉटेल नेमके कुठले, याबाबत खमंग चर्चा रंगली होती.
-----
तीन तक्रारी दाखल झाल्याची चर्चा
हनी ट्रॅपशी संबंधित तीन तक्रारी मंगळवारी दुपारी ठाणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या असून, त्यावर गोपनीय चौकशी सुरू आहे. या तक्रारी ठाणे, नवी नुंबई आणि नाशिक येथील अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत, अशी वावडी उठली. प्रत्यक्षात ठाणे पोलिस आयुक्तालयाने या वृत्तास दुजोरा दिला नाही. उलट अशी कोणतीही तक्रार आयुक्तालयात दाखल नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.