राज्यातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषेचे वर्ग
सहकार्याचे जपानचे राजदूत किची ओनो यांचे आश्वासन
मुंबई, ता. ३१ : भारत व जपानचे सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय संबंध अतिशय घनिष्ट आहेत. परंतु भारतातील युवकांना जपानच्या विद्यापीठांबद्दल फारशी माहिती नाही. भारतातून अवघे एक हजार ६०० विद्यार्थी जपान येथे उच्च शिक्षण घेत आहेत. त्याउलट चीनमधील लाखांहून अधिक विद्यार्थी जपान येथे शिक्षण घेत आहेत, असे नमूद करून महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषेचे वर्ग सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी येथे केले.
मुंबई भेटीवर आलेल्या जपानच्या राजदूतांनी मंगळवारी (ता. २९) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. जपान-भारत शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने या वर्षी हैदराबाद येथे विद्यापीठ परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राजदूत किची ओनो यांनी या वेळी सांगितले.
उभय देशांमधील लोकस्तरावर संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने जपान कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान व विद्यार्थी आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सूक असल्याचे ओनो यांनी सांगितले. जपानी पर्यटक अधिक संख्येने भारतात येण्यासाठी येथील पायाभूत सुविधा अधिक विकसित करणे, पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्याच्या सुविधा वाढवणे तसेच जपानी भाषेच्या दुभाषांची उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे राजदूतांनी नमूद केले.
जपान व भारताचे राजनैतिक संबंध अतिशय घनिष्ट आहेत, परंतु त्या तुलनेत उभयपक्षी व्यापार हा चीन-जपान व्यापाराच्या तुलनेने अतिशय कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी दोन्ही देशांमधील चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवणे आवश्यक आहे. व्यापाराशिवाय कृषी, क्रीडा, शिक्षण, कौशल्य आदी क्षेत्रांत सहकार्य वाढवणे आवश्यक आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी राजदूतांना सांगितले.
बौद्ध धर्मामुळे भारत व जपानमधील सांस्कृतिक संबंध घनिष्ट आहेत, असे सांगून हे संबंध आणखी वाढविण्यासाठी जपानने क्रीडा, विशेषतः व्हॉलीबॉल व टेबल टेनिस, कृषी विज्ञान, विशेषतः मशरूम लागवड या क्षेत्रात राज्याला सहकार्य करावे, असे राज्यपालांनी सांगितले.
जपानने मातृभाषा जपल्यामुळे तेथील संस्कृतीवर इंग्रजी भाषेसोबत येणाऱ्या पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव पडला नाही. भारतातील लोकांना जपानच्या लोकांची शिस्तबद्ध जीवनशैली फार आवडते.
- सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.