‘एमएमसी’ प्रमाणपत्राशिवाय सेवा
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील प्रकार
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : बनावट एमएमसी (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) प्रमाणपत्रांच्या आधारे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांबद्दल चौकशी सुरू असताना आता व्ही. एन. देसाई रुग्णालयात एमएमसी प्रमाणपत्राशिवाय काम करणाऱ्या एका डॉक्टरचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराज आचार्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, पालिकेच्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने ‘या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देईन,’ असे सांगितले.
डॉ. भरत सावंत यांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात प्रमाणपत्राशिवाय काम केल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत पालिका रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या थर्ड पार्टी डॉक्टरांची पडताळणी केली जाते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी एमएमसी नोंदणी अनिवार्य आहे, परंतु पालिकेचे सांताक्रूझस्थित व्ही. एन. देसाई रुग्णालय स्वतः हा नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग चालविण्यासाठी ‘साई संजीवनी’ नावाच्या पॉलीक्लिनिकची नियुक्ती करण्यात आली होती. या कंत्राटदाराचे काम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागत दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी डॉक्टर पुरवणे आहे. त्याद्वारे डॉ. भरत सावंत यांची व्ही. एन. देसाई रुग्णालयात नियुक्ती केली गेली. नियमानुसार त्यांच्याकडे डॉक्टर पदवी आणि एमएमसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीदरम्यान डॉ. भरत यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली नाही. त्यानंतर हे काम दुसऱ्या डॉक्टरकडे सोपवण्यात आले; ज्यांनी पडताळणीसाठी कागदपत्रं पाठवली आणि एमएमसीने उत्तर दिले, की डॉ. भरत यांचे नाव एमएमसी नोंदणीमध्ये नाही किंवा एमएमसीने त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी कोणतेही परवानगी पत्र दिलेले नाही. डॉ. भरत सावंत यांच्याकडे एमएमसचे प्रमाणपत्र नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.
रशियामधून डॉक्टरकी
डॉ. भरत सावंत म्हणाले, ‘मी २०२४मध्ये रुग्णालयात रुजू झालो, त्याच वेळी डॉ. जयराज आचार्य यांना सांगितले, की माझ्याकडे एमएमसी प्रमाणपत्र नाही. मी रशियामधून डॉक्टरकी केली आहे. माझी कागदपत्रे साई संजीवनीच्या लेखापाल भगवान यांनी पालिकेला सादर केली आहेत. मी स्पष्टपणे सांगितल्यानंतरही मला काम करण्यास सांगितले गेले आणि आता मला गोवले जात आहे. मला पाच महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.