बीडीडी चाळ पुनर्विकास; म्हाडाकडे मोठा गृहसाठा
वरळीत ७६, नायगावला ६९ तर ना. म. जोशी मार्गावर ५४ मजली इमारती उभ्या राहणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील ५५६ रहिवाशांना गुरुवारी (ता. १४) चावी वाटप केले जाणार आहे. त्यासाठी म्हाडाने सुमारे ४० मजली इमारती उभारलेल्या असल्या तरी म्हाडाकडून उभारल्या जाणाऱ्या विक्रीयोग्य सदनिकांच्या इमारती आकाशाला गवसणी घालणार असल्याचे समोर आले आहे.
म्हाडाच्या प्रस्तावित सुधारित आराखड्यानुसार वरळी येथे ७६ मजली, नायगावला ६९ तर ना. म. जोशी मार्ग येथे सुमारे ५४ मजली इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात दक्षिण मुंबईत म्हाडाकडे मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होऊ शकणार आहे.
मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी असून, त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जात आहे. सुमारे ९२ एकर जागेवर १९५ बीडीडी चाळी असून, त्यामध्ये १५ हजार ५९३ सदनिका, गाळे आणि व्यावसायिक स्टॉल आहेत. बीडीडी चाळींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास केला जाणार असून, येथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान, बीडीडीवासीयांना घरे देऊन शिल्लक राहणाऱ्या जागेवर म्हाडाकडून निवासी आणि व्यावसायिक इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामध्ये विक्रीयोग्य निवासी इमारतीच्या प्रस्तावित सुधारित आराखड्यानुसार तिन्ही बीडीडी चाळींच्या ठिकाणी विक्रीयोग्य सदनिकांच्या इमारती गगनचुंबी असतील, अशी माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मध्यम, उच्च उत्पन्न गटासाठी सदनिका
बीडीडीच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या विक्रीयोग्य इमारतीमध्ये मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिका असणार आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७५ ते १०० चौरस मीटरच्या घरात असणार आहे. या घरांची विक्री म्हाडाकडून लॉटरी पद्धतीने होऊ शकणार आहे.
कुठे, किती मजली इमारत होणार?
वरळी बीडीडी
तळमजला - १
पोडियम - १०
निवासी मजले - ६६
सदनिका
मध्य उत्पन्न गट - ३.३५४
उच्च उत्पन्न गट - १.७२६
नायगाव बीडीडी
तळमजला - ३
पोडियम - ७
मजले - ६२
सदनिका
मध्य उत्पन्न गट - १.३१४
उच्च उत्पन्न गट - ४४०
ना. म. जोशी मार्ग बीडीडी
तळमजला - ३
पोडियम - ७
मजले - ४७
सदनिका
मध्य उत्पन्न गट - ७२८
उच्च उत्पन्न गट - ५४०
वरळी बीडीडीवासीयांना आज चावी वाटप
वर्षानुवर्षे १६० चौरस फुटाच्या घरात दिवस काढणाऱ्या ५५६ वरळी बीडीडीवासीयांना पहिल्या टप्प्यात उद्या गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप केले जाणार आहे. सकाळी ११ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे बीडीडीवासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.