पालिकेची कोट्यवधींची कर थकबाकी
चार मोठ्या मालमत्ता जाहीर लिलावाला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने मालमत्ता कर चुकविणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध थेट कारवाई सुरू केली आहे. थकबाकी वसुलीसाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येत असून, संबंधितांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे.
चुनाभट्टीतील शांती सदन सहकारी गृहनिर्माण संस्था (३.२८ कोटी थकबाकी), चेंबूर येथील हाउसिंग कमिशनर इमारत क्र. १ (२.७० कोटी), मुंबई-३ येथील अब्दुल रहमान स्ट्रीटवरील मानेकशॉ मिनोचर गांधी यांची इमारत व दुकाने (२.२४ कोटी) आणि बोरिवली पश्चिमेतील राजानी हाऊस (३१.८१ लाख) या मालमत्तांची नावे लिलावाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. महापालिका अधिनियम १८८८च्या कलम २०६ (२) नुसार, थकीत कर भरण्यास नकार देणाऱ्या किंवा नोटिसा धाब्यावर बसविणाऱ्या मालकांविरुद्ध जाहीर लिलाव करून थकबाकी वसूल करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. त्यानुसार पालिकेने धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला आपल्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायचे आहेत, त्या दृष्टीने महापालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई
नोटीस मिळाल्यानंतर ठरावीक कालावधीत थकबाकी भरली नाही, तर लिलावाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, सामान्य नागरिक नियमित कर भरतात, पण मोठे घरमालक, संस्था किंवा व्यावसायिक कर टाळतात. यापुढे करचुकवेगिरी सहन केली जाणार नाही. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता सरळ लिलावात काढण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.