एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
परिवहन मंत्र्यांचे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, त. ७ : एसटी महामंडळाच्या कामगारांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता.७) मंत्रालयात कामगार संघटनांसोबत झालेल्या बैठकीत दिले.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन सहसचिव राजेंद्र होळकर तसेच संदीप शिंदे, श्रीरंग बरगे, हनुमंत ताटे,मुकेश तिगोटे यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले की, ‘कामगारांचे थकीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते, तसेच दिवाळी अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. २०१८ पासून ही देणी प्रलंबित असून त्यासाठी सुमारे ४,४०० कोटी रुपये लागतील. दरवेळी शासनाकडे निधी मागणे योग्य नाही. त्याऐवजी एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आवश्यक आहे. तसेच आधुनिक पार्सल सेवेतून वर्षाला १०० कोटी रुपये मिळतील. एसटीच्या बस आगारातील पेट्रोल पंप सध्या फक्त एसटी बससाठी इंधन पुरवतात, पण भविष्यात व्यावसायिक स्वरूपात सुरू करून वर्षाला २००-२५० कोटी रुपये मिळवले जातील. यामुळे एकूण ५००-६०० कोटी रुपये उत्पन्न वाढेल.’ ते पुढे म्हणाले की, एसटीचे स्वतःचे प्रवासी ॲप तयार होत असून, त्याद्वारे टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाइक सेवा देण्याची योजना आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) द्वारे विकास एसटीच्या जागांचा विकास पीपीपी तत्त्वावर केला जाईल. यात कामगारांसाठी सदनिका आणि विश्रामगृहे बांधण्याची योजना आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळतील आणि महामंडळाला वर्षाला हजार ते पंधराशे कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.
पुढील वर्षाअखेर ८,००० नवीन बसेस ताफ्यात सामील होतील, ज्यामुळे एकूण बस संख्या अठरा ते वीस हजार होईल. यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्थायी भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने कामगार भरती केली जाईल. यामुळे नवीन बसेसद्वारे प्रवासी सेवा सुधारेल आणि उत्पन्न वाढेल.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
==
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या सोबत खेळीमेळीत चर्चा झाली; पण आजच्या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनावर ठाम असून १३ ऑक्टोबरपासून ठिय्या आंदोलन सुरू होईल.
- श्रीरंग बरगे सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
---
परिवहन मंत्री व राज्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या समजून घेतल्या; परंतु मागण्या मान्य होईपर्यंत १३ तारखेपासून आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. आणखी चार संघटनांनी पाठिंबा दिल्याने कृती समितीत १६ संघटना सहभागी झाल्या आहेत.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.