आता पोस्ट ऑफिस थेट तुमच्या खिशात
‘डाक सेवा २.० ॲप’द्वारे मिळतात अनेक सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २३ : भारतीय टपाल खात्याने ‘डाक सेवा २.०’ हे नवीन मोबाइल ॲप लाँच केले आहे. या सुविधेचा वापर १३ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या ॲपमुळे टपाल कार्यालयात जाण्याची गरज संपली असून, पोस्टाच्या सर्व महत्त्वाच्या सेवा आता मोबाइलवर उपलब्ध झाल्या आहेत. पोस्ट ऑफिसची सेवा तुमच्या खिशात मिळणार, अशी माहिती पोस्ट विभागाने दिली आहे.
पोस्टाच्या विविध योजना सुरक्षितता आणि चांगला परतावा देणाऱ्या असल्याने या ॲपद्वारे सर्व व्यवहार घरबसल्या करता येण्याची मोठी सोय आहे. त्यामुळे नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या रांगा, फॉर्म, कागदपत्रांची धावपळ यापासून मुक्तता मिळणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अनेकदा ग्राहकांची गर्दी दिसून येते. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ऑफिस खुले राहत असल्याने कामे होत नाहीत.
पोस्ट विभागात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. येथे रोकडसह यूपीआयद्वारेही पैसे स्वीकारले जातात. पोस्ट विभागाने रजिस्टर पोस्टाची सुविधा बंद केलेली आहे. स्पीड पोस्ट सेवा कायम आहे. ग्राहकांनी नव्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकाच ॲपमध्ये सुविधा
तक्रार नोंदणी व स्टेटस तपासणी समावेश करण्यात आला आहे. पोस्ट सेव्हिंग अकाउंट माहिती खात्याची माहिती आणि व्यवहार तपासण्याची सोय. डिजिटल सेवा एकाच ॲपमध्ये पार्सल बुकिंग, ट्रेकिंग, पोस्टेज दर, तक्रार नोंदवणे ह्या सर्व सेवा ‘डाक सेवा २.०’ ॲपमध्ये सहज उपलब्ध आहेत.
पत्ते अधिक अचूक
ओळखण्यासाठी खास डिजिटल कोड आहे. यामुळे वितरणात गती आणि अचूकता वाढते. ॲपमुळे पोस्ट ऑफिसमधील कामाचाही भार कमी होणार आहे.
कोणत्या प्रमुख सुविधा?
* पार्सल ट्रॅकिंग - पाठवलेल्या स्पीड पोस्ट किंवा पार्सलची स्थिती त्वरित पाहता येणार
* मनी ऑर्डर : पोस्टात न जाता मोबाइलवरून मनी ऑर्डर पाठवण्याची सोय
* स्पीड पोस्ट फी कॅल्क्युलेटर : कोणत्या सेवेसाठी किती शुल्क लागेल याची माहिती उपलब्ध
* इन्शुरन्स : पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएलआय/आरपीएलआया पेमेंट विभा हप्ते सहज भरण्याची सुविधा.
डिजिटल सेवांचे नवे पाऊल
‘डाक सेवा २.०’ हे इंडिया पोस्टच्या आयटी २.० उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून, पोस्टल नेटवर्कचे डिजिटल रूपांतर करण्याच्या दिशेने घेतलेले मोठे पाऊल मानले जात आहे.