सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : हवामानातील बदलामुळे मुलांना सर्दीचा त्रास वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच जिवाणू आणि विषाणूंमुळे होणारे संक्रमण, नाकातील हाडांची वाढ यामुळे श्वसनात अडथळा येण्याचा म्हणजेच सायनुसायटीचा धोका वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नुकतेच नाकाचे हाड वाढलेल्या तसेच वारंवार सर्दी होत असल्याने श्वासोच्छ्वासात अडथळा येत असलेल्या दहा वर्षांच्या बालरुग्णावर मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
नाकाच्या वाकड्या हाडालाच सामान्यत: नाकाचे हाड वाढणे असे संबोधले जाते. ही वाढ कधी उजव्या, डाव्या किंवा दोन्ही बाजूला असते. नाकाचे हाड वाढण्याच्या कारणात गर्भावस्थेत तसेच जन्माच्या वेळी नाकाच्या कूर्चामयी हाडावर दाब आल्यामुळे तिथे बाक येतो. आरव राजपुरोहितला सात वर्षांपासून वारंवार सर्दीचा होणे आणि श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. श्वासोच्छ्वासाचा त्रासातून रात्री नीट झोपदेखील येत नव्हती. त्याला वारंवार नेब्युलायझेशन करावे लागायचे. स्थानिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हवामानातील बदलानुसार त्याला वारंवार सर्दी होत होती.
कान-नाक-घसा आणि हेड नेक सर्जन डॉ. शीतल राडिया यांनी सांगितले की, या मुलाचे नाक वाहणे, सायनुसायटिस आणि डोकेदुखी, वारंवार सर्दी आणि खोकला होऊन नाक बंद होणे अशी लक्षणे दिसून आली. त्याची एक बाजूची नाकपुडी पूर्णपणे बंद झाली होती आणि तो तोंडाद्वारे श्वास घेत होता. त्याला एडेनोइडायटिस (घशाच्या मागील टिश्यूची जळजळ) आणि नाकाचे हाड वाकडे होते. या रुग्णाला नाकातून श्वास घेता येत नसल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. नाकातील हाड सरळ करण्याची ही शस्त्रक्रिया सुमारे दोन तास चालली. त्यानंतर तो योग्य प्रकारे श्वास घेऊ लागला.
मुलांकडे लक्ष द्या
आपण अनेक बालरूग्ण पाहतो ज्यांना वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. यातील बहुतांश रुग्ण तोंडाने श्वास घेतात, रात्री घोरतात आणि तोंड उघडे ठेवून श्वास घेतात. अशा रूग्णांमध्ये अॅडिनोइड्स देखील वाढलेले असतात (घशाच्या मागे टॉन्सिलचा प्रकार जेथे नाक आणि घसा एकमेकांना जोडलेले असतात). लहान मुलांच्या पालकांनी मुले तोंडाने श्वास घेत आहेत की नाही हे तपासावे. मुलामध्ये अॅडेनोइड्स वाढले आहेत का हे पाहण्यासाठी ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कारण यामुळे केवळ श्वासोच्छ्वासाचा त्रास होत नाही, तर मुलाच्या सामान्य वाढीमध्येदेखील व्यत्यय येतो. बालरुग्णांसाठी योग्य वेळी अॅडिनोइड्सवर उपचार करणे महत्वाचे आहे.
सायनुसायटीस म्हणजे
कवटीच्या हाडामध्ये नाकाच्या आजूबाजूला तसेच कपाळामध्ये पोकळ्या असतात. त्याला सायनस असे म्हणतात. या पोकळ्यांचा होणारा दाह म्हणजे सायनुसायटिस होय. सायनसमध्ये पाणी आणि पू भरल्यावर सायनुसायटिस होतो.
कारणे
वारंवार थंडीचा लाट
जिवाणू आणि विषाणूंचे संक्रमण
नाकातील हाडांची अतिरिक्त वाढ
प्रदूषण
ॲलर्जी
लक्षणे
नाक वाहणे
तीव्र डोकेदुखी
डोळे लाल होणे, सूज येणे
वारंवार घसा दुखणे
आवाजात बदल होणे
श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होणे.
गुंतागुंत
सायनुसायटीसवर योग्य वेळी उपचार न केल्याने दृष्टी धूसर होणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे, वारंवार घशाचे संक्रमण, टॉन्सिलिटिस, स्वरयंत्राचा दाह, पॉलिप्सचा त्रास होतो. सायनसमध्ये तयार होणेपॉलीप्समुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ शकतो.
उपचार
नाकातील पॉलिप्स काढण्यासाठी एखाद्याला शस्त्रक्रिया करावी लागते. सायनुसायटिसकडे दुर्लक्ष करू नका आणि गुंतागुंत टाळण्यासाठी वेळेवर ईएनटीचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.