मुंबई

ग्रामीण भागाला महालक्ष्मी पावणार

CD

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २६ : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या ५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासाठी मंदिर ट्रस्ट व स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या यात्रेमुळे ग्रामीण भागातील स्थानिकांना रोजगाराचे साधन प्राप्त होणार असून सुमारे अडीच हजार दुकाने सजणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अर्थकारणाला चालना व वेग मिळणार आहे.
डहाणूतील महालक्ष्मीच्या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच गुजरात राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. तसेच महालक्ष्मी गडावर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. नवरात्रोत्सवातदेखील नऊ दिवस यासाठी प्रचंड गर्दी असते. यंदा यात्रेनिमित्त भाविकांना गैरसोय होऊ नये, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. तसेच मंदिराला रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात आले असून विद्युत रोषणाईने हा पूर्ण परिसर उजळून निघणार आहे. यात्रेच्या काळात सावर्जनिक स्वच्छतेची काळजी घेण्यात आली असून आरोग्य, शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी आदी सुविधाना प्राधान्य देण्यात आले आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विजेची चोरी होऊ नये म्हणून महावितरण विभागाने प्रत्येक दुकानदाराला तात्पुरत्या मीटरची व्यवस्था केली आहे. तहसीलदार, पोलिस आदींनी परिसराचा आढावा घेऊन संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे सोमवारी (ता.२७) पाहणी करणार आहेत.
......
यात्रेत अडीच हजार दुकाने
यात्रेत पूजेच्या साहित्यापासून ते खाद्यपदार्थांसह आकाशपाळणे, जंगलातील रानभाजी, दुर्मिळ वस्तू विकण्यासाठी विक्रेते दाखल होत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना यात्रेमुळे व्यवसायाचे साधन प्राप्त झाले आहे. यंदा यात्रेत सुमारे अडीच हजार दुकाने असतील; तर अडीच लाख भाविक या यात्रेत सहभागी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
---------------
अशी आहे आख्यायिका
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात विव्हळवेढे येथे ६०० फूट उंच असणाऱ्या डोंगरावर श्री महालक्ष्मी देवीचे पुरातन मंदिर आहे. जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी या मंदिराची स्थापना केली. या देवीची आख्यायिकादेखील प्रसिद्ध आहे. एका गरोदर मातेस महालक्ष्मी देवीच्या दर्शनाची ओढ लागली होती. ती महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आली होती; परंतु उंच डोंगरावर चढता येईना, त्यामुळे या महिलेने मी गडाच्या पायथ्याशी आहे तिथे तू मला दर्शन दे, अशी विनंती देवीला केली. त्यामुळे गरोदर मातेला दर्शन देण्यासाठी देवी गडावरून खाली उतरली व त्याच ठिकाणी हे मंदिर बांधले आहे, अशी गडावरील महालक्ष्मी देवीची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
.........
डहाणू महालक्ष्मी मंदिरात यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक सुविधांची पूर्तता तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रस्टतर्फे उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच स्थानिक प्रशासनदेखील आढावा घेत असून त्यांचे सहकार्य लाभत आहे.
- संतोष देशमुख, अध्यक्ष महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट
-------------------
अत्यावश्यक सेवा
महालक्ष्मी यात्रेसाठी आपत्तीव्यवस्थापन देखील तैनात होणार आहे. यासाठी अग्निशमन दलाची वाहने, जवान तसेच रुग्णवाहिका, फिरत्या शौचालयाची व्यवस्था देखील असणार आहे. याचबरोबर पोलिस बंदोबस्ताबरोबरच सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या पोलिसांच्या चौक्या उभारल्या जाणार आहेत. त्यानुसार पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे.
---------------------
मंदिर परिसरात सीसीटीव्हीचा वॉच
भाविकांच्या व्यवस्थेसाठी ६० सुरक्षा रक्षक, २० स्वयंसेवक तर १५ सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षितेत दृष्टिकोनातून मंदिर परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत; तर मुख्य मार्गावर दोन फिरते कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT