मुलुंड, ता. ९ (बातमीदार) ः शाळा व महाविद्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ असा शासन निर्णय असतानाही अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पाहायला मिळत होते. यासंदर्भात शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर यांनी २०२० पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले असून शासनाने या निर्णयाची ठोस अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
रमेश खानविलकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट शाळा व महाविद्यालयाच्या परिसरातील ‘नो पार्किंग’बाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अप्पर मुख्य सचिव गृहविभाग संजय सक्सेना यांना ‘नो पार्किंग’च्या आदेशाची तातडीने अंमलबजावणीचे निर्देश दिले. त्यानुसार वाहतूक सहपोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी शाळेच्या प्रवेशद्वारात उभे राहणाऱ्या वाहनांना सक्त कारवाईचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसाना दिले आहेत.
आंदोलनापूर्वीच निर्णय
‘नो पार्किंग’ नियमाची अंमलबजावणी गेले अनेक वर्षे विविध भागांमध्ये योग्य प्रकारे होत नव्हती. या संदर्भात रमेश खानविलकर यांनी महाराष्ट्र दिनापासून उपोषणाला बसणार, असे जाहीर केले होते. मात्र तत्पूर्वीच शासनाने व वाहतूक पोलिसांनी याची दखल घेऊन ‘नो पार्किंग’ धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिस यांनी कायदा अंमलबजावणीचे काम करण्यास सुरुवात केली आहे. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे पालन व शासन आदेश पाळणे हे जनहित आहे. यापुढेही समाजात होणाऱ्या गैरकृत्यांवर, नागरिकांवर होणारा अन्याय याविरोधात माझे आंदोलन सुरूच राहील.
- रमेश खानविलकर, शिक्षणतज्ज्ञ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.