मुंबादेवी (बातमीदार) : बांधकाम कंत्राटदारांकडून बांधकाम कामगारांची नोंदणी होत नसल्याने अनेक बांधकाम कामगारांना सरकारी सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच या कामगारांना सरकारच्या या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. परिणामी सरकारी तिजोरीत बांधकाम कामगारांच्या महामंडळाचा निधी पडून आहे. बांधकामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळणे तसेच कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र नोंदणी कुठे करायची, कशी करायची, याची माहिती बांधकाम कामगाराचे नेते कॉम्रेड मधुकांत पथारीया हे वेळोवेळी देत असतात; मात्र कंत्राटदाराच्या असहकार्यामुळे कामगारांची नोंदणी होत नसल्याचे मधुकांत पथारिया यांनी सांगितले. नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांचे वय १८ ते ६० असावे, त्या कामगारांनी मागील वर्षभरात किमान ९० दिवस बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे; मात्र कंत्राटदार या ९० दिवसांमध्ये सातत्य दाखवत नसल्याने कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही, असे ते म्हणाले.
……
पटेलवाडीतील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात
मालाड (बातमीदार) : पश्चिमेतील पटेलवाडी येथे अनेक पिढ्यांपासून सहाशेहून अधिक कुटुंबे राहत आहेत. या परिसरातील एका जागेवर एका खासगी विकसकाने कब्जा केला आहे. या ठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक या नागरिकांना त्रास देत आहेत. या ठिकाणी एका खासगी कंपनीने ११४ एकर जमीन आमची असून आम्ही शासनामार्फत करार करून घेतली आहे, असे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच या ठिकाणी १९९७ मध्ये एक भिंत उभी केली होती, याची माहिती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना देताच त्यांनी कारवाई करून ती भिंत जमीनदोस्त केली होती; तरीही काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांना सांगून स्थानिकांना जागा रिकामी करण्यास ही कंपनी सांगत असते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी रहिवाशांनी पोलिसांत तक्रारदेखील केली आहे.
…..
महाराणा प्रताप क्रीडांगणामुळे खेळाडूंना दिलासा
मालाड : पश्चिमेला बांधण्यात आलेल्या महाराणा प्रताप क्रीडांगणाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या क्रीडांगणात फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन, पॅडल बॉल, पिकल बॉल आदी खेळांसाठी दोन एकर जागेवर टर्फ ग्राऊंड बांधण्यात आले आहे. या क्रीडांगणाच्या उद्घाटनप्रसंगी ॲड्रियन डिसोझा (भारतीय संघाचा माजी हॉकी गोलकीपर), रोमियो अल्बुकर्क (माजी ज्युनियर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार), चिन्मय प्रभू (पिरामिक्स पझल सॉल्व्ह गेममध्ये ४ वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक) आणि क्रीडाजगताशी संबंधित खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
…..
छपन्नाव्या वर्षी मिळवली पदवी
ज्योत्स्ना यांनी गोराई येथील प्रगती हायस्कूलमधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेंटरमध्ये प्रवेश घेतला. वाणिज्य विभागातील पहिल्या वर्षात शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यानंतर शिक्षक आणि मैत्रिणीच्या मदतीने त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तृतीय वर्षातच्या सुरुवातीपासून त्यांनी उत्तरपत्रिका लिहिण्याचा सराव केला. यादरम्यान त्यांचे पती लक्ष्मण आजारी पडले. ते रुग्णालयात उपचार घेत होते. या समस्यांना तोंड देत टी.वाय.बी.कॉम.ची त्यांनी परीक्षा दिली.
…..
संत रोहिदास मार्गावर कारवाई सुरू
धारावी (बातमीदार) : धारावीतील संत रोहिदास मार्ग हा मुंबईतील एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्यावर त्याचा ताण मुंबईतील वाहतुकीवर होतो. या रस्त्यावरील दुकानदारांना टेम्पो, ट्रक रस्त्यावरच उभे करून व्यापाऱ्यांना माल दिला जातो. यामुळे सतत वाहतूक कोंडी होते. याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत वाहतूक विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिस अजय नागरे हे सातत्याने कारवाई करत आहेत.
….
धारावी : संत रोहिदास मार्गावर पार्क केलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
…..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.