नवरात्रोत्सवात देशी झाडे लावणारा वृक्षप्रेमी
राजीव डाके, सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ५ : नवरात्रोत्सवात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत आहे. अनेकजणांचे नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे घालून मिरवणे सुरू आहे. तर, काही दांडिया रास खेळण्यात मग्न आहेत; पण ठाण्यातील एक व्यक्ती या उत्सवाला निसर्गाशी जोडून त्याचा आनंद घेत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत तो सह्याद्रीच्या मातीत रुजणारी नऊ प्रकारची औषधी आणि निसर्ग उपयोगी झाडे लावून हा उत्सव साजरा करत आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली दुर्मिळ देशी झाडे लावून या झाडांवर त्यांना पक्ष्यांचा किलबिलाट वाढवायचा आहे.
ठाण्यातील कोपरीत राहणारे विलास सावंत निसर्गावर प्रेम करणारी व्यक्ती आहे. सह्याद्रीची डोंगररांगा ते पिंजून काढतात. तेथील औषधी, बहुपयोगी झाडांच्या बियांचे संकलन करून त्या शहरातील, लोकवस्तीच्या परिसरात रुजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवरात्रोत्सवात त्यांनी नऊ दिवसांत नऊ प्रकारच्या दुर्मिळ होत चाललेल्या देशी झाडांची लागवड सुरू केली आहे. प्रत्येक घटमाळेच्या दिवशी एका प्रजातीचे जाड लावून ते मातृभूमीला अर्पण करीत आहेत. यासाठी त्यांनी ठाण्यातील कोपरी भागात असलेला स्वामी समर्थ मठाचा मार्ग निवडला आहे. या मार्गावरील रस्त्याच्या कडेला त्यांची लागवड करत आहेत.
शनिवारी (ता. ५) माळेचा तिसरा दिवस होता. या दिवशी त्यांनी करंज प्रजातीच्या रोपांची लागवड केली आहे. या झाडाचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. करंज तेलाचा जंतूनाशक म्हणून उपयोग करतात. झाड मोठे झाल्यावर त्यापासून बारा महिने दाट सावली मिळते. कमी पाण्याच्या ठिकाणीही ते वाढते, तग धरून राहते. तर, पहिल्या माळेत सावंत यांनी शेमट (मोई) या जातीच्या रोपाची लागवड केली. या झाडाचे लाकूड जलरोधक असते. जुलाब, दातदुखी, खोकल्यासाठीही गुणकारी आहे.
दुसऱ्या माळेला त्यांनी नंदिवृक्ष वर्गातील (नांदृक) वृक्षांची लागवड केली. हा पक्ष्यांचा आवडता वृक्ष आहे. डेरेदार आणि सदा दाट सावली देणारा असल्याने त्यावर सदा पक्ष्यांचा वास असतो. तर, पुढील सहा दिवस विलास सावंत हे याच परिसरात स्वामी समर्थ मठाच्या वाटेवर सहा प्रकारच्या वृक्षांची लागवड करणार आहेत. त्यात पांगारा, डिकेमाली, सीताअशोक, रोहितक, भोकर, निर्गुडी आणि दसऱ्याला दहाव्या दिवशी पूत्रांजिव या वृक्षांचा समावेश आहे.
चौथी माळ ः वृक्ष पांगारा - उपयोग - खेळणी आणि कोरीव कामासाठी. फुलापासून लाल रंग, आव, ज्वर, निद्रानाशासाठी साल वापरतात.
पाचवी माळ ः डिकेमाली वृक्ष - उपयोग दुर्मिळ वृक्ष, खोडापासून राळयुक्त डिंक, त्वचारोग, जंत, हिवताप यासाठी आणि गुरांच्या जखमांवर कीडनाशक म्हणून वापर.
सहावी माळ ः सीता अशोक वृक्ष - मधुर, सुगंधी, रक्तदोषनाशक, झाडाची साल कडू/तुरट असून तिचा उपयोग पोटदुखी, स्त्रीरोग, अतिसार, कृमी, सूज, जळजळ, अस्थिव्यंग, मूत्रविकारांवर होतो. पित्त तसेच रक्तातील दोष व रक्तविकारावर सालीचा वापर केला जातो. (साल बाहेरून खडबडीत व आतून लाल असते) फुलाचा रस अतिसारावर उपयुक्त असतो. फुलाचे चूर्ण रक्तस्रावावर व मूत्रविकारात उपयोगी पडते.
सातवी माळ ः रोहितक वृक्ष - बियांपासून दिव्यासाठी लागणारे तेल. सालीचा काढा यकृत विकारात वापरात. लाकूड कठीण आणि टिकाऊ घरबांधणीसाठी.
आठवी माळ ः भोकर वृक्ष - फळाचे लोणचे, पक्ष्यांचे आवडते फळ, अतिसार आणि लघवीची आग कमी होण्यासाठी उपयोग.
नववी माळ ः निर्गुडी वृक्ष - कुंपणासाठी उपयोग, कीटकनाशक म्हणून वापर, शेताच्या बांधावर, बागेत उपयोग, सूज कमी करण्यासाठी पाला गरम करून बांधतात.
दसरा दहावी माळ ः पुत्रांजिव वृक्ष - लाकूड कठीण आणि टिकाऊ, गुरांना चारा म्हणून उपयोग, कुंपणासाठी रांगेने लावून हिरवीगार झाडाची भिंत बनवण्यासाठी.
नवरात्रोत्सवात दहा झाडे लावून हा उत्सव साजरा करत आहे. ग्रीन अम्ब्रेला संस्थेसोबत सह्याद्रीच्या डोंगरातून या झाडांच्या बिया संकलित करून त्याची रोपे तयार केली आहेत. ती दोन वर्षांची झाल्यावर विकत घेऊन या ठिकाणी १० प्रजातींचे रोपण करत आहे. पक्षी आणि झाडांचे अतूट नाते आहे. पक्ष्यांमुळे झाडांचा समतोल राखला जातो. त्यांच्या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुजण्यास मदत होते. माणसांनी केवळ अशा वृक्षांचे संवर्धन करून हे निसर्गचक्र अबाधित ठेवणे आवश्यक आहे. तसा लहानसा प्रयत्न करीत आहे.
- विलास सावंत, वृक्ष अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.