डहाणू ः हा मतदारसंघ सीपीएमचा बालेकिल्ला आहे. भाजपचे पास्कल धनारे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून सीपीएमचे विनोद निकोले यांनी गड राखला होता; मात्र सद्यःस्थितीत या मतदारसंघात भाजप पक्ष संघटना व ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०१९च्या निवडणुकीतील आमदार विनोद निकोले यांना ७२ हजार ११४ मते मिळाली होती; तर पास्कल धनारे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दोघांमध्ये विजयासाठी चार हजार ७०७ एवढेच मताधिक्य होते. याठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना तिकीट मिळाले तर महायुती सर्व ताकद पणाला लावणार यात काही शंका नाही. तर, महाविकास आघाडीकडून मैदानात उतरणाऱ्या विनोद निकोले यांनी निवडून येण्यासाठी तगडे आव्हान असणार आहे.
---------------------------------------------
वाढवण बंदर मुख्य मुद्दा
पालघर जिल्ह्यातील डहाणू हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. डहाणू तालुक्यातील काही गावे आणि तलासरी तालुक्याचा या मतदारसंघात समावेश होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षाचे येथे वर्चस्व राहिले आहे. सर्वाधिक काळ सीपीएम व काँग्रेसच्या आमदारांना या मतदारसंघात मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे डहाणू विधानसभा मतदारसंघ ‘लाल बावट्या’चा बालेकिल्ला मानला जातो. डहाणू येथे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाणार आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा डोके वर काढण्याची शक्यता आहे. तर, आदिवासीबहुल क्षेत्रातील विकासकामे निवडणुकीत मुख्य मुद्दा राहणार आहे.
-------------------------------------------------------
बोईसर ः मतदारसंघातून २०१९ साली बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी सेनेचे उमेदवार विलास तरे यांचा पराभव केला. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार पाटील यांना ७८ हजार ७०३ मते मिळाली तर विलास तरे दुसऱ्या क्रमांकाची मते होती. दोघांमध्ये विजयाचे अंतर दोन हजार ७५२ इतके होते; पण लोकसभा निवडणुकीत राजेश पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे विधानसभेत बहुजन विकास आघाडीला उमेदवार निवडून आणताना मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी मतदारसंघ सध्या पिंजून काढला जात आहे. याठिकाणी जगदीश धोडी यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे; तर भाजपने उमेदवार दिल्यास विलास तरे यांची लॉटरी लागू शकते. त्यामुळे याठिकाणी काटे की टक्कर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
----------------------------------
स्थानिक मुद्दे महत्त्वाचे
बोईसर मतदारसंघात शहर आणि गावांचा समावेश आहे. काही भाग हा महामार्गालगत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी, रस्त्याची दुरवस्था आणि रोजगारासाठी करावी लागणारी फरपट या मुद्द्यावर निवडणूक रंगणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.