नेरूळ, ता. २८ (बातमीदार) : वसुबारसनिमित्त गाय-वासराचे पूजन करून सोमवारपासून दीपोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारपेठांसह घरे, अंगणे रोषणाईने सजलेली दिसत आहेत. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत पाच दिवस चालणारा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दिवाळी जवळ आली की आपल्याला हमखास आठवण होते पहाटे तेल आणि मग उटणे लावून केलेली अंघोळ. या दिवसात अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व असल्याने उटण्यामुळे दिवाळीतील पहाट अधिक सुगंधी होणार आहे.
दिवाळीत कडाक्याच्या थंडीत पहाटे अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. अभ्यंग स्नानाचे महत्त्व आयुर्वेदातदेखील मांडलेले आहे. त्यामुळे विविध नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले सध्याच्या बोलीभाषेतील सुगंधी स्क्रबर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक महत्त्वाचे असून उटणे लावण्यामुळे शरीराला अनेक फायदे आहेत. पूर्वीच्या काळी दिवाळी सणाच्या आदल्या दिवशीच घरी उटणे बनवले जायचे. घरी तयार केलेले उटणे शुद्ध आणि नैसर्गिक असते. हे उटणे आता बाजारात सहजरीत्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे दीपोत्सवाच्या तयारीला आता वेग आला असून शरीरासाठी आरोग्यदायी असलेल्या उटण्याच्या सुगंधातून सणाचा गोडवा अधिक वृद्धिंगत होणार आहे. यामुळे महिलावर्गातून दिवाळी व इतर खरेदीसोबत बाजारपेठेतील सुगंधी उटणे खरेदी केले जात आहे. याची किंमत १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे.
--------------
उटणे लावून अंघोळ करण्याचे फायदे
१. त्वचा कोरडी पडत नाही
उटणे लावून अंघोळ केल्याने त्वचा कोरडी पडत नाही. आंबेहळद त्वचा मऊ ठेवण्यासाठी मदत करते. उटण्यात मसूरची डाळ असते. मसूरची डाळ ही त्वचेसाठी किंवा त्वचा उजळ ठेवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक क्रीममध्ये मसूरच्या डाळीचा वापर केला जातो.
२. चमकदार चेहरा
काळवंडलेली त्वचा उजळण्यास आणि त्वचेवर साचलेला मृत स्तर कमी करण्यास मदत करते. परिणामी त्वचा सुधारते. चंदनामुळे त्वचेत थंडावा राहण्यास मदत होते. उटण्यामध्ये रक्तचंदन, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.
३. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात
वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
---------------
घरच्या घरी तयार करा
उटणे बनवताना वाटीमध्ये एक चमचा बेसन घेऊन त्यात चंदन पावडर मिक्स करा. नंतर त्यात गुलाबाच्या फुलांची पावडर, केशरच्या काड्या, हळद आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. या साहित्याचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सुगंधी उटणे बनवू शकता. उटणे भिजवताना त्यात तुम्ही दूध किंवा गुलाब पाण्याचा वापर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.