प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
भाईंदर, ता. २४ : महायुतीच्या मतांची विभागणी होऊ नये, यासाठी ‘बटेंगे तो कंटेंगे’ या घोषवाक्याचा प्रभावीपणे केलेला वापर आणि पक्ष कार्यकर्त्यांची मजबूत फळी या जोरावर भाजपचे नरेंद्र मेहता यांनी विजयश्री अक्षरशः खेचून आणत इतिहास रचला. सोबतच या मतदारसंघात एकदा झालेला आमदार पुन्हा विजयी होत नाही, हा समजही खोडून काढण्यात ते यशस्वी ठरले.
मिरा-भाईंदर मतदारसंघात गुजराती, जैन, राजस्थानी व उत्तर भारतीय मतदार निवडणूक निकालावर प्रभाव टाकतात. ही भाजपची मतपेढी आहे. या मतांची मोट ज्या उमेदवारासोबत तो या ठिकाणी विजयी होतो. गेल्या वेळी या मतात विभाजन झाल्याने मेहता यांचा पराभव करून गीता जैन विजयी झाल्या होत्या. त्यामुळेच या वेळी या मतांसाठी नरेंद्र मेहता व गीता जैन यांच्यात मोठी चुरस होती. या मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाली, तर मविआचे मुझफ्फर यांचा विजय होणार हे अगदी स्पष्ट होते. यासाठीच भाजपने अचूक व्यूहरचना आखत ‘बटेंगे तो कंटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हा संदेश मतदारांपर्यंत आक्रमकपणे पोहोचवला. एवढेच नाही, तर योगी आदित्यनाथ यांच्यासह राजस्थान व उत्तराखंड राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते यांच्या माध्यमातून हा संदेश मतदारांच्या मनावर बिंबवला. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन भाजपची मतपेढी अबाधित राहिली आणि मत विभागणी टळली.
दुसरीकडे मेहता यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मजबूत फळी प्रचारात सहभागी होती. संघ परिवारही आपल्या पद्धतीने कार्यरत होता. शिवाय पक्षापासून दूर गेलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांनाही मेहता यांनी सोबत घेतले. मतदानाच्या दिवशी हक्काचे मतदान कसे होईल याचे काटेकोर नियोजन मेहता यांनी केले होते. या व्यतिरिक्त गेल्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन अंतर्गत दगाबाजीचा फटका बसू नये, यासाठी मेहता यांनी स्वतःची यंत्रणाही सक्रिय केली होती. या सर्वाचा सकारात्मक परिणाम मतांच्या रूपाने दिसून आला. या आधी मिरा-भाईंदरची निवडणूक सलग दोन वेळा जिंकणे एकाही आमदाराला शक्य झालेले नाही. परंतु, एकदा पराभूत झाल्यानंतरही यशस्वी पुनरागमन करून मेहता यांनी मिरा-भाईंदर मतदारसंघासाठी नवा इतिहास निर्माण केला आहे.
गीता जैन यांचे निर्णय चुकले
पराभूत झालेल्या आमदार गीता जैन यांचे अनेक निर्णय चुकत गेले. जैन यांनी निवडून आल्यापासून भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मग शिंदे सेना अशी सातत्याने केलेले पक्षबदल मतदारांना रुचले नाही. पुन्हा निवडून आल्यानंतर त्या कोणत्याही पक्षाला समर्थन देऊ शकतील, अशी शक्यता मतदारांच्या मनात घर करून होती. पाच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात कोणतीही ठोस विकास कामे केली नाहीत. हा मतदारांमध्ये निर्माण झालेला समजही त्या पुसू शकल्या नाहीत. प्रचारादरम्यान आपण कोणती कामे केली हे मतदारांना सांगण्यापेक्षा त्यांनी नरेंद्र मेहता यांच्यावरच टीकेची झोड उठवण्यात धन्यता मानली, जी मतदारांना अजिबात रुचली नाही. कोणत्याही पक्षाचे नसलेले पाठबळ, स्वयंप्रेरीत कार्यकर्त्यांची वानवा, गीता जैन यांना मत म्हणजे काँग्रेसला मत ही मतदारांमध्ये निर्माण झालेली भावना याचाही फटका त्यांना बसला. मनोमिलनानंतरही भाजप व महायुतीमधील काही नेते गीता जैन यांचा छुपा प्रचार करत होते; मात्र मतदारांनी त्यांनाही स्पष्टपणे नाकारले.
मुझफ्फर हुसेन यांचे अपेक्षित यश दूरच
मुझफ्फर हुसेन यांची विजयाची सर्व मदार ही गीता जैन या महायुतीची मतविभागणी करतात यावरच होती. मात्र, त्यात त्या सपशेल अपयशी ठरल्यामुळे हुसेन यांच्या पदरी निराशा पडली. अपेक्षित असलेली मविआची मते मिळवण्यात हुसेन यशस्वी ठरले; मात्र ती मते विजयाचा सोपान चढण्याइतपत पुरेशी नव्हती. शिवाय, भाईंदर पश्चिम व पूर्व भागात कमकुवत असलेला पक्ष, भाजपचे बटेंगे तो कटेंगेला प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आलेले अपयश यामुळे हुसेन यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.