कचऱ्याच्या समस्येचा डोंगर
झोपडपट्टी भागात ड्रम घेऊन कर्मचारी गोळा करणार कचरा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : पालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागातील कचराकुंड्या बंद करून घरोघरी कचरा गोळा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. तसेच या उपक्रमाची अंमलबजावणीदेखील केली; मात्र आता हा उपक्रम अपयशी ठरला असल्याचे दिसून येत आहे. त्यात घंटागाड्यांच्या वेळांचे नियोजन कोलमडले असल्याने रहिवासी मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकत आहेत. ही कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी घनकचरा विभागाचे कर्मचारी २०० लिटरचा ड्रम घेऊनच उभे राहणार आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापलिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठाणे पालिकेकडून विविध उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत; मात्र यात पालिकेला फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यात झोपडपट्टी भागातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यातदेखील पालिकेला अपयश येत आहे.
झोपडपट्टी भागात प्रत्येक गल्लीबोळात घंटागाडी जात नाही. ती मुख्य रस्त्यावर येत असते. त्यातही या गाडीच्या वेळादेखील निश्चित नाहीत. त्यामुळे सकाळीच कामावर जाणारे येथील रहिवासी गाडी वेळेत आली नाही, तर ज्या ठिकाणी आधीपासूनचा कचरा साठलेला आहे त्याच ठिकाणी कचरा टाकतात. मध्यंतरी महापालिकेने अशा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईदेखील केली होती. त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. या उणिवांमुळे येथील रहिवासी सकाळ आणि रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेत कचरा टाकतात. यातूनच झोपडपट्टी भागातील कचऱ्याची समस्या अद्याप सुटू शकलेली नाही.
दुसरीकडे झोपडपट्टी भागात भंगारवाले, हॉटेलवाले आणि या भागात पार्क होत असलेल्या वाहनांमुळे काही ठिकाणी कचऱ्याचे डम्पिंग तयार होताना दिसते. घनकचरा विभागामार्फत आता प्रत्येक प्रभाग समितीनिहाय ज्या झोपडपट्टींच्या ठिकाणी इतरत्र कचरा टाकला जात आहे अशा ठिकाणांचा सर्व्हे करणार आहेत. दरम्यान, झोपडपट्टी भागातील कचऱ्याची ही समस्या सोडविण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर्मचारी सर्व्हे करणार आहेत. ज्या रस्त्यावर कचरा टाकला जात आहे त्या ठिकाणी आता पालिकेचे कर्मचारी दोन सत्रांत २०० लिटरचा ड्रम घेऊन उभे राहणार आहेत. त्या ड्रममध्येच कचरा टाकण्यासाठी आवाहन करणार आहेत.
झोपडपट्टी भागातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. ज्या भागात कचरा टाकला जात आहे त्या भागांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी कर्मचारी ड्रम घेऊन उभे केले जाणार आहेत.
- मनीष जोशी, उपायुक्त, घनकचरा विभाग, ठाणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.