एनएनएमटीची गतिमानतेकडे वाटचाल
महसुलीसह भांडवली ५३४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
वाशी, ता. २५ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकाअंतर्गत परिवहन सेवेचा साडेपाचशे कोटींचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. या वेळी मिळणारे उत्पन्न, शासकीय अनुदान आणि त्यातून देण्यात येणाऱ्या सवलतीच्या योजना आदी त्रिसूत्रीला आधारित असा हा अर्थसंकल्प एनएमएमटीकडून मांडण्यात आला. या वेळी वाशी टर्मिनलच्या कामाचे लाकार्पण, शहरात उभारले जाणारे चार्जिंग स्टेशन, पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश आदीबाबत आयुक्तांनी हिरवा झेंडा दाखविला आहे.
नवी मुंबई शहरासह मुंबई, ठाणे, कल्याण, डोबिवली, बदलापूर, उरण, खोपोली, कर्जत अशा शहरांना दळणवळणाने जोडण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाने जाळे विणले आहे. परिवहनच्या सेवेत दाखल झालेल्या बसेसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न आणि शासनाचे अनुदान यातून आलेल्या बसेस नागरिकांसाठी सवलतीच्या योजना अशा त्रिसूत्रीवर आधारित असणारा एनएनएमटीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे परिवहन व्यवस्थापक योगेश कडसुकर आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौडकर यांनी सादर केला. परिवहन सेवेने नवी मुंबई महापालिकेच्या अनुदानासह आरभांच्या शिलकीसह एकूण महसुली व भांडवली ५३४ कोटी जमा व महुसली भांडवली ५३३ कोटी ९० लाख ६० हजार खर्चासह नऊ लाख ४० हजार शिल्लकी जमाखर्चाचे अंदाजपत्रक पालिका आयुक्तांनी मंजूर केले. शहरातील सर्वच रस्त्यांवर इलेक्ट्रिक बस सध्या धावत आहेत. परिवहन सेवेच्या कारभाराचा डोलारा अधिक वाढल्याने बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेत मोबाईल तिकीट, वाहनांची जीपीएस नोंदणी त्याचप्रमाण अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर प्रवाशांना माहिती देण्यासाठी प्रणाली अवगत केली आहे. त्याचप्रमाणे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देत परिवहनने आपला गाढा आतापर्यंत हाकला आहे. महसुली खर्चासाठी ४१२ कोटी ६८ लाख ६० हजार तसेच जेएनएनयूआरएम प्रकल्प दोनअंतर्गत २९ कोटी ८२ लाख असे मिळून ४२२ कोटी ५० लाख ६० हजारांची तरतूद यंदा अर्थसंकल्पात केली आहे.
.....................
वाशी टर्मिनलचे काम पूर्ण
वाशी बस डेपोची वाणिज्य वापराच्या अनुषंगाने बांधणी पूर्ण झाली आहे. याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. त्याच धर्तीवर मोठ्या जागेतील आगारांचेदेखील आता रुपडे पालटण्यासाठी पालिका नियोजन करणार आहे. सिडकोने ऐरोली येथे परिवहन उपक्रमासाठी जागा आरक्षित ठेवली आहे. या जागेवर महापालिकेच्या माध्यमातून आगामी कालावधीत विकसित करून परिवहन उपक्रमासाठी ही जागा ताब्यात घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे बस डेपोचे वाशीच्या धर्तीवर वाणिज्य वापरासाठी नियोजन करण्यासाठी आढावा घेण्यात येणार आहे.
.......................
चार्जिंग स्टेशन उभारणार
नवी मुंबई परिवहन सेवेत सध्या ५४७ बस आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक इलेक्ट्रिक बसेस या केंद्र शासनाच्या धोरणानुसार खरेदी करण्यात आलेल्या आहेत. या बसच्या चार्जिंगकरिता नव्याने आसूडगाव आगार येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शहरात खासगी वाहनांसाठीदेखील चार्जिंग स्टेशनची संकल्पना आखली आहे.
.....................
चौकट
जुन्या बस मोडीत काढणार
परिवहन सेवेतील वातानुकूलित व्होल्वो बस जुन्या झाल्या असून, प्रारंभी घेतलेल्या बसदेखील अनेक आगारांमध्ये पडून आहेत. या बस मोडीत काढून त्यातून उपलब्ध निधीद्वारे सुविधा देल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.