अंबरनाथ, ता. २० (बातमीदार) : शहरात २५ वर्षांपासून राहत असूनही पायवाटा, वीज, गटारे यांसारख्या नागरी सुविधा नाहीत. त्या मिळाव्यात या मागणीसाठी मोर्चात सहभागी झालेल्या पोतराज यांनी स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटकारे मारत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या वेळी येत्या सात दिवसांत सुविधा देण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे संस्थेला देण्यात आले.
सर्कस मैदान परिसरात नाथपंथी, डबरी, वडार, गोसावी, बंजारा, कैकाडी, बहुरूपी अशा भटक्या विमुक्त जातीचे ५३० कुटुंबे ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्या मिळाव्यात, यासाठी नाथपंथी डबरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. २०) नगरपालिका कार्यालयावर पारंपरिक वेशभूषेत मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. स्वतःच्या अंगावर आसूड ओढणारे, गोंधळी, संबळ वादन बहुरूपी, पोतराज आदींनी लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने नागरिक कुटुंबीयांसह उपस्थित राहत प्रशासनाला समस्यांचे साकडे घातले. संस्थेचे अध्यक्ष इंगोले यांच्यासह कामगार नेते श्याम गायकवाड, कमलाकर सूर्यवंशी, कैलास भांडलकर, राहुल हंडोरे, सुंदर डांगे, मंगेश सोळंकी शिष्टमंडळाने उप मुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन दिले.
काय आहेत मागण्या?
सर्कस मैदान परिसरातील नाथपंथी, डबरी, वडार, गोसावी, बंजारा, कैकाडी, बहुरूपी अशा भटक्या विमुक्त नागरिकांना हक्काचे घर मिळावे, म्हणून अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे संस्थेचे अध्यक्ष इंगोले यांनी सांगितले. सर्व कुटुंबाचे परिसरात पुनर्वसन करावे, त्यांना घरपट्टी लागू करण्यात यावी, पिण्याचे पाणी मिळावे, हक्काचा निवारा मिळावा या आणि इतर मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
सुविधा पुरवण्यात येणार
सर्कस मैदानात असलेल्या नागरी सुविधा पुरवण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत नागरी सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले. येत्या सात दिवसांत नागरी सुविधा पुरवण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा इंगोले यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.