जिल्हा परिषदेसाठी रणनीती
ग्रामविकास मंत्र्यांच्या दौऱ्याने चर्चांना उधाण; भाजपची मोर्चेबांधणी
राहुल क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ ः जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांसह ठाणे जिल्हा परिषदेवर एकहाती कमळ फुलवून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न भाजप पाहत आहे. त्यात मागील निवडणुकीत भाजपने त्या दिशेने वाटचाल सुरू केली होती; मात्र शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेत भाजपचे मनसुबे धुळीस मिळविले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीची मोट बांधत सत्ता स्थापन केली. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या हातातून थोडक्यात संधी हुकली; पण या वेळी थेट राज्यातून बळ मिळत असल्याने स्थानिक भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्याने या चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद पणाला लावणार असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र बदललेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम या निवडणुकांवर होणार असल्याचा दावा जाणकार करीत आहेत. अशातच पहिल्यांदाच राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे हे ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या बैठकीवर भाजपची छाप दिसून आली. त्यामुळे गोरे यांच्या दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविधकामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी जिल्हा समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गणपत गायकवाड, राजेश मोरे, दौलत दरोडा, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, संजय केळकर, ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते. यामध्ये महायुतीतील मित्रपक्षांपैकी शिवसेनेचे राजेश मोरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे दोन आमदार वगळता या बैठकीवर भाजपची छाप दिसून आली. या वेळी भाजपच्या आमदारांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तर मंत्री गोरे यांनीदेखील जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची गती पाहता समाधानी नसल्याचे सांगत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
‘एकला चलो रे’चा नारा
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरदेखील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिवसैनिक पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. तर असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व जिल्हा परिषदेतील सदस्यांनी शिंदे यांना साथ दिली. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादीची असलेल्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजपसह शिवसनेनेदेखील केले; मात्र ते सत्यात उतरले नव्हते. त्यामुळे २०१७च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ‘एकला चलो रे’चा नारा देत, कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहिले होते. ते शिवसेनेच्या खेळीमुळे सत्यात उतरलेच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून भाजपच्या स्थानिक नेत्यांना बळ मिळत आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्याने तशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
...अन् संधी हुकली
२०२७ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ जागांपैकी शिवसेनेकडे २६ जागा, १४ जागा भाजपला, राष्ट्रवादीला १०, काँग्रेस एक आणि एक अपक्ष असे सदस्य निवडून आले होते. अपक्ष सदस्याने भाजपच्या गटात नोंदणी केल्याने भाजपचे संख्याबळ १५ झाले आहे. तर फेरमतदान झालेल्या शेलार गटातून भाजपने विजय मिळविल्याने त्यांचे संख्याबळ १६ झाले होते. त्या वेळी शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची मोट बांधून झेडपीवर कमळ फुलविण्याचे मनसुबे आखले होते. तर शिवसेनेला बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसशी तडजोड यशस्वी झाली तरच शिवसेनेला भगवा फडकविता येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी यशस्वी चर्चा करीत मोट बांधण्यात शिवसेनेने यश संपादित करून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.