कल्याणमधील बॅनरबाजीमुळे चर्चा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : हिंदीसक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांमुळे शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिंदीसक्तीच्या विरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र आल्याचे सर्वांना पाहायला मिळणार होते. त्याआधीच सरकारने हा निर्णय रद्द केल्याने मोर्चादेखील रद्द करण्यात आला. यानंतर विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच ठाकरे गटाकडून ठाकरे बंधूंच्या एकीबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘ठाकरे केवळ नाव नाही, ती ताकद आहे; ती सरकारलाही झुकवते,’ असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे.
इयत्ता पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा शिकविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सरकारच्या या निर्णयाला सर्वच स्तरांतून विरोध होऊ लागला. राज्यभर विविध स्तरांतून याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलैला राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. याला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी होण्याचे सांगितले. त्यानुसार मराठी बांधवांना पक्ष बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला पाठींबा दर्शविला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळेल असे म्हटले जात असतानाच राज्य सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला. सरकारने मागे हटताच ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द झाला. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यामागे ‘ठाकरे ताकद’ अधोरेखित करीत शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याणमध्ये ठाकरे बंधूंच्या एकीची बॅनरबाजी करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोरच हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हात मिळवल्याचा फोटो झळकावण्यात आला आहे. ‘ठाकरे ब्रँडचा धसका घेतला. ठाकरे हे केवळ नाव नाही, ती ताकद, जी सरकारलाही झुकवते!’’ असा ठळक मजकूर या बॅनरवर छापला आहे. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख संदीप पंडित आणि विभागप्रमुख रोहन पोवार यांनी हा बॅनर लावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.